शासनाकडून आता ४५ वर्षापुढील नागरिकांना कोव्हीड लस दिली जाणार आहे. यामुळे तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी ५० वाइल्सची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर यांच्याकडे केल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा दोडमनी यांनी सांगितले.
प्रारंभी ४५ ते ५९ वर्षांच्या नागरिकांना कोविशिल्ड लसीकरण मोहिमेचा सांगोला तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्र व सांगोला ग्रामीण रुग्णालयास प्रतिदिनी १०० डोसचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार तालुक्यात पहिला डोस ३०९२ तर दुसरा डोस ११४७ तसेच ६० वर्षाच्या आतील ४५ ते ५९ वर्षाच्या आतील नागरिकांना १४०३ तर ६० वर्षाच्या पुढील वृद्धांना ९१८ असे ६७४८ नागरिकांना कोविशिल्ड लसीकरण केले आहे.
शासनाकडून आता ४५ वर्षापुढील नागरिकांना कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. त्यानुसार सांगोला तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी ५० वाइल्सप्रमाणे ३ हजार डोसची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर यांच्याकडे केली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ. सीमा दोडमनी यांनी सांगितले.
मागील दहा दिवसात आढळले १८८ पॉझिटिव्ह रूग्ण
गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव होवून सांगोला तालुक्यात १६०८ तर शहरात १०५७ असे २६६५ पर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पोचली होती. त्यापैकी ६३ नागरिकांचा मृत्यू झाला. दरम्यान गेल्या दहा दिवसात सांगोला शहर व तालुक्यात एकूण १८८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा दोडमनी यांनी सांगितले.