श्रीपूर : महाळूंग-श्रीपूर गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे. यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळींनी एकमताने बहिष्कार टाकला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना या गावातून कोणताही अर्ज दाखल झाला नाही. बहिष्कार यशस्वी झाला आहे. राज्य सरकारकडे गाव नगरपंचायत व्हावी यासाठी जोर लावला आहे.
महाळूंग-श्रीपूर या ग्रामपंचायतीची नगरपंचायत होणार आहे. नगरपंचायतमार्फतच गावाचा विकास होणार आहे. या गोष्टी लक्षात घेऊन ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. बुधवारी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे गावाची निवडणूक प्रक्रिया होणार नसून, प्रशासक गावाचा कारभार काही महिने हाकणार आहे.
माळशिरस तालुक्यातील महाळूंग-श्रीपूर ही ग्रामपंचायत विस्ताराने मोठी आहे. ती तीन विभागांमध्ये विस्तारलेली आहे. गावाची लोकसंख्या जवळपास २५ हजार असून १५ हजारापर्यंत मतदार आहेत. यामध्ये एकूण सहा प्रभाग येतात. १७ सदस्यांची संख्या आहे. श्रीपूर हे नगरपंचायत होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राज्य शासनानेसुद्धा या गावाची ग्रामपंचायत निवडणूक रद्द करावी, अशी विनंती निवडणूक आयोगाला केली होती; पण कोणताही निर्णय न झाल्याने निवडणूक लागली.
--
महाळूंग-श्रीपूरकरांचा एकोपा
माळशीरस तालुक्यात अकलूज, नातेपुते, महाळूंग-श्रीपूर या ग्रामपंचायतीला स्वतंत्र नगरपंचायतीचा दर्जा मिळणे हे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे तिन्ही ग्रामपंचायतीने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसी महाळूंग-श्रीपूर हे गाव सोडून बाकीच्या गावांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले यात गावचा एकोपा दिसून आला.
---
ग्रामपंचायत निवडणूक न लढवण्याचा सर्व पॅनल प्रमुख व ग्रामस्थांना विनंती केली. ग्रामस्थांनीही एकमुखी पाठिंबा दिला. त्यामुळे नगरपंचायतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गावाचा विकास साधता येणार आहे.
- रामचंद्र सावंत-पाटील
ज्येष्ठ ग्रामस्थ, महाळूंग
--
कोरेनाच्या काळात राजकारण करणे हे जनतेला, पुढा-याला परवडणारे नव्हते. त्यामुळे महाळूंग ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्वांना एकत्र बोलावले होते. एकाही उमेदवारांनी अर्ज न भरण्याचा निर्णय झाला.
- संभाजीराव जाधव-घोंगाने
ग्रामस्थ, महाळूंग
----
शासनाने महाळूंगला नगरपंचायत करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतपेक्षा नगरपंचायतीला विकासनिधी जास्त असतो. निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनी त्याला संमती दिली.
- राहुल रेडे-पाटील
ग्रामस्थ, महाळूंग
----
महाळूंगसह अक्कलकोट, दक्षिणमधील गावांनी टाकला होता बहिष्कार
विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान रस्ते आणि पाण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील गुड्डेवाडी आणि अंकलगी या दोन गावातील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यात कुडल येथील ग्रामस्थांनीही बहिष्कार टाकला होता. महाळूंग ग्रामपंचायत विस्तारित असल्याने पायाभूत सुविधा अभाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे गट नंबर २ येथील प्रभागातील ग्रामस्थांनी रस्ते, गटारी, आरोग्य या पायाभूत सुविधासाठी २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.