शीतलकुमार कांबळे, सोलापूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्याने गुरुवार ९ मेच्या रात्रीपासून हॉटेल्स, बार हाऊसफुल्ल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आचारसंहिता शिथील झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आनंदी आहेत. इतक्या दिवसात झालेले नुकसान भरुन निघेल अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
आचारसंहितेमुळे गेले महिनाभर रात्री साडेनऊ वाजता हॉटेल्स बंद केली जात होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे रात्री साडेनऊ वाजता हॉटेल्स आणि बार बंद केले जाऊ लागल्याने या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. एकीकडे सुट्ट्या सुरू झाल्या असतानाही म्हणावा तसा या व्यवसायामध्ये उठाव दिसत नव्हता. अशातच बाहेरगावांहून येणाऱ्या प्रवाशांनाही याचा फटका बसत होता.
खासगी कंपन्यांच्या रात्री होणाऱ्या बैठका, कार्यक्रम, गेट टुगेदर असे कार्यक्रमही आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आले होते. अशातच मंगळवार ७ मे रोजी मतदान झाल्याने गुरुवार ९ मे पासून आचारसंहिता शिथिल झाली. त्यामुळे रात्री शहरातील विविध हॉटेल्स आणि बारवर गर्दी होण्याचा मार्ग मोकळा झाला.४०० बार अंड रेस्टॉरंट तर ३५० रेस्टॉरंट
शहरात ४०० बार तर ३५० रेस्टॉरंट आहेत. या ठिकाणी सर्व एकत्र येऊन जेवण करण्याचे अनेकदा नियोजन केले जात होते. मात्र, सगळे एकत्र होण्यातच दहा वाजायचे. मग, हॉटेलात जाऊन काय करायचे या मानसिकतेतून गेले महिनाभर अनेकजण हॉटेलमध्ये किंवा बारमध्ये जात नव्हते. आता आचारसंहिता शिथील झाल्याने खवय्यांना दिलासा मिळाला आहे.