निवडणुकीनंतर प्रत्येकाने विजयाचे दावे-प्रतिदावे केले आहेत. काही हौशी उमेदवारांनी तर ग्रामदैवताला अभिषेक घालत विजयासाठी आपले देव पाण्यात ठेवले आहेत. काही कार्यकर्त्यांनी माझाच उमेदवार निवडून येईल म्हणून शेकडो रूपयांच्या पैजा लावल्या आहेत. प्रत्यक्ष आज मतमोजणी होत आहे. त्यामुळे दुपारपर्यंत कोण किती पाण्यात आहे, याचा फैसला होणार असल्याने या मतमोजणीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
लक्षवेधी लढतीकडे लक्ष
पंढरपूर तालुक्यात ७१ ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी होत असली तरी करकंब, कासेगावमध्ये दोन देशमुखांमधील लढत, भाळवणी, गादेगाव प्रभाग २ मधील लक्षवेधी लढत, सुस्ते, पटवर्धन कुरोली, खर्डी, बोहाळी, सोनके, तिसंगी, कौठाळी, पिराची कुरोली, भंडीशेगाव, रोपळे, नारायण चिंचोली, गोपाळपूर आदी महत्त्वाच्या मोठ्या गावांमध्ये तालुक्याचे नेतृत्व करत असलेले नेते गावात आघाड्यांमार्फत ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचाही कस लागणार आहे. यामुळे या गावातील लक्षवेधी लढतींकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.