सोलापूर: कोरोनामुळे लांबलेल्या संस्थांच्या निवडणुकीचा मुहूर्त पुढील २०२१ या वर्षात लागण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या दोन व संपणाऱ्या पाच साखर कारखान्यांसह १७९५ हून अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या आघाडीच्या नेत्यांचा या निवडणुकीसाठी कस लागणार आहे.
सर्व काही सुरळीत चालू आहे मात्र कोरोनाची दुसरी लाट येईल असे सांगितले जात आहे. अशातही शिक्षक, पदवीधर, बिहार विधानसभा निवडणुका पार पडल्या. राज्यपाल कोट्यातून आमदारकी देऊन नेतेमंडळींना खूश करण्याचा प्रयत्न सुरू आहे; मात्र गावपातळीवरच्या निवडणुकीसाठी कोरोनाचा संसर्ग निमित्त ठरला आहे. २०२१ वर्षात मात्र निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावरील दोन साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत २०२० मध्ये संपली आहे. तर पाच साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व जून महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे मुदत संपणाऱ्या साखर कारखान्यांच्या निवडणुकाही मे महिन्यापर्यंत घेणे आवश्यक आहे.
२०२० या वर्षात जिल्ह्यातील अ, ब, क, ड संवर्गातील १७९५ सहकारी संस्थांची मुदत संपल्याने संचालक मंडळाला मुदतवाढ दिली आहे. याशिवाय राहिलेल्या २४४९ सहकारी संस्थांपैकी बहुतांशी संस्थांच्या संचालक मंडळाचीही मुदत २०२१ मध्ये संपत आहे. यामुळे या संस्थांच्याही निवडणुका होणार आहेत.
- - श्री पांडुरंग कारखान्याच्या संचालकांची मुदत २७ मार्च २० व विठ्ठलराव शिंदे कारखान्याची मुदत २५ मे २० रोजी संपली आहे.
- - स्व. आमदार भारत भालके चेअरमन असलेल्या श्री विठ्ठल गुरसाळेची मुदत २६ जानेवारी २०२१, श्री संत दामाजी कारखान्याची १७ फेब्रुवारी, संत कूर्मदास कारखान्याची २३ फेब्रुवारी, भीमा टाकळी सिकंदरची मुदत २७ मार्च तर सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याची मुदत ८ जून २०२१ रोजी पूर्ण होत आहे.
- - अ संवर्गातील (कारखाने, बॅँका, सूतगिरणी व मोठ्या संस्था) -३, ब संवर्गातील ८५७, क संवर्गातील ४७६ व ड संवर्गातील २६९ अशा १७९५ संस्थांची मुदत २०२० मध्ये संपली आहे.
- - जिल्ह्यातील एकूण ४२४४ सहकारी संस्थांपैकी १७९५ संस्थांची मुदत २०२० मध्ये तर उर्वरित २४४९ संस्थांपैकी २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या संस्थाच्याही निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत.
शासन आदेशानुसार १७९५ सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या संस्थांची माहिती मागवली नाही. सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत जे आदेश येतील त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.
- कुंदन भोळे
जिल्हा उपनिबंधक, सोलापूर