पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ सहानभूतीच्या लाटेवर बिनविरोध होईल, अशी शक्यता होती. मात्र, प्रमुख पक्षांसह तब्बल ४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामधील काही अर्ज छाननीत बाद झाले तर अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर १९ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडी, भाजपमध्ये न होता बंडखोर व अपक्षांमुळे बहुरंगी होत आहे.
यामध्ये भगीरथ भालके व समाधान आवताडे हे प्रमुख दोन उमेदवार असले तरी महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या शैला गोडसे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे-पाटील यांनी आपापले उमेदवारी अर्ज कायम ठेवत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढविली आहे.
भाजपमध्येही समाधान आवताडे यांचे चुलतबंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन मतविभागणी टाळण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. सिद्धेश्वर आवताडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे ते किती मते घेतात आणि त्याचा फटका कोणाला बसतो, यावरच महाविकास आघाडी व भाजपच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित असेल, अशी चर्चा सुरु आहे. या प्रमुख उमेदवारांशिवाय अभिजीत बिचकुले, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, बळीराजा शेतकरी संघटनेच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसतो याच्याही चर्चा आता रंगत आहेत.
रविवारी प्रचाराचे नारळ फुटणार
शनिवारी उमेदवारी अर्ज निश्चित झाल्यानंतर स्वाभिमानीकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत रांझणीत शंभू महादेवाला अभिषेक घालून प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. महाविकास आघाडीकडून रविवारी सकाळी ११ वाजता जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत रांझणीतूनच प्रचाराचा शुभारंभ होत आहे.