श्रीपूर : विद्युत खांबावर तारेला स्पर्श होऊन विजेचा धक्का बसून, एक वानर जखमी झाल्याची घटना माळशिरस तालुक्यात महाळुंग येथे सोमवारी घडली. स्थानिक ग्रामस्थांनी माळशिरस वनविभागाला याबाबत फोनवर माहिती दिली. त्यानंतर, वनविभागाचे काही अधिकारी त्या ठिकाणी येऊन जखमी वानराला उपचारासाठी घेऊन गेले. पुढे त्या वानराचे काय झाले, हे अद्याप कळाले नाही.
माळशिरस तालुक्यात महाळुंग येथे यमाईदेवी मंदिर परिसरात गेली अनेक शतकांपासून वानरांचा वावर आहे, परंतु गावातील खांबांमधून विजेचा धक्का बसून, यापूर्वी अनेक वानरांचा मृत्यू झाला आहे. याबाबत गावकऱ्यांनी, प्राणिप्रेमींनी, स्थानिक ग्रामस्थांनी, यमाईदेवी भक्तांनी अनेक वेळा आवाज उठविला. माळशिरस वनविभाग, तसेच महावितरण कंपनीकडे अनेक तक्रारी अर्ज व वानराना विजेचा धक्का लागून होणाऱ्या मृत्यूला आळा बसण्यासाठी आंदोलने केली. पत्रव्यवहार केले, तक्रारी दिल्या, परंतु दोन्ही विभागांकडून पूर्तता करतो, लाइटच्या प्लास्टीक कोटिंग असलेल्या तारा, केबल गावांमध्ये टाकून घेतो. अशा प्रकारची आश्वासने देण्यात आली, परंतु ती अद्याप पूर्ण झाले नाहीत.
दरम्यान, वेळीच वनविभाग आणि महावितरण कंपनीने वानराबाबत खबरदारी घेतली असती, तर तो अपघात टळला असता. यापुढील घटना टळाव्यात, म्हणून अंमलबजावणी करावी, अशी मागणी यमाईदेवी माता प्रतिष्ठान महाळुंग आणि भक्तांमधून होत आहे.