सोलापूर : महावितरणची वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे आॅगस्ट महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ४९३ ग्राहकांनी १९ कोटी ९८ लाख वीजबिलाचा आॅनलाईन भरणा केला आहे़ आता सप्टेंबर महिन्यात लघुदाब वीजग्राहकांची संख्या सोलापूर विभागात ३ लाख ७१ हजारांवर गेली आहे तर गेल्या आॅगस्ट महिन्यात १९ कोटी ९८ लाख रुपयांचा वीजबिल भरणा झाला आहे. क्रेडिट कार्ड वगळता अन्य पर्यायाद्वारे आॅनलाईन वीजबिल भरणा नि:शुल्क करण्यात आले असून, ०.२५ टक्के सूट देण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
वीजबिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहणे टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत आॅनलाईन वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध झाली आहे. महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढत असल्याची स्थिती आहे. महावितरणकडून आॅनलाईन वीजबिल भरण्यासाठी विविध उपक्रमांतून ग्राहकांना सातत्याने माहिती देण्यात येत आहे. गेल्या आॅगस्टमध्ये सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ४९३ वीजग्राहकांनी १९ कोटी ९८ लाख वीजबिलाचा आॅनलाईन भरणा केला आहे.
अकलूज विभागातील ७ हजार ५६७ ग्राहकांनी १ कोटी ४४ लाख, बार्शी विभागातील १७ हजार ८७८ ग्राहकांनी ३ कोटी २६ लाख, पंढरपूर विभागातील १६ हजार १४६ ग्राहकांनी ३ कोटी २४ लाख, सोलापूर ग्रामीण विभागातील १९ हजार ३२३ ग्राहकांनी ३ कोटी ६५ लाख तर सोलापूर शहर विभागातील ३९ हजार ५७९ ग्राहकांनी ८ कोटी ३९ लाख रुपयांचा आॅनलाईन वीजबिल भरणा केला आहे.
आॅनलाईनद्वारे होणारे वीजबिल नि:शुल्क- आॅनलाईन बिल भरणा झाले नि:शुल्क - के्रडिट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीजबिल भरण्यासाठी आॅनलाईनचे उर्वरित सर्व पर्याय आता नि:शुल्क करण्यात आले आहे. याआधी नेटबँकिंगचा अपवाद वगळता वीजबिलाचा आॅनलाईन भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडिट कार्ड वगळता नेटबँकिंग, डेबिट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून आॅनलाईनद्वारे होणारा वीजबिल भरणा आता नि:शुल्क करण्यात आले आहे.
आॅनलाईन बिल भरल्यास 0.२५ टक्के सूट- लघुदाब वीजग्राहकांसाठी आॅनलाईन बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. के्रडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकात ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. ही सूट मिळविण्यासाठी संबंधित ग्राहकांकडे वीजबिलाची थकबाकी नसावी तसेच वीजबिलाचा भरणा हा प्रॉम्ट पेमेंट डिस्काउंटच्या निर्धारित वेळेत करणे आवश्यक आहे.