सोलापूर : महावितरणच्या बारामती परिमंडलातील वीजबिलांचे थकबाकीदार असलेल्या ४७ हजार ४३८ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा या महिन्यात शून्य थकबाकी' मोहिमेत खंडित करण्यात आला आहे. ही मोहीम सुटीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याने दि. २९ व ३० मार्चला महावितरणचे वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत.
बारामती परिमंडलात वीजबिलांची थकबाकी वसुल करण्यासाठी 'शून्य थकबाकी'ची विशेष मोहिम सुरू आहे. या महिन्यात आतापर्यंत बारामती, सातारा व सोलापूर मंडलात ११ कोटी १२ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी ४७ हजार ४३८ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा ३ हजार १८९ थकबाकीदारांचा वीजपुरवठा २ कोटी १६ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. सातारा मंडलातील ४ हजार ३४३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा ८५ लाखांच्या थकीत वीजबिलांमुळे खंडित करण्यात आला आहे. तर सोलापूर मंडलातील ३९ हजार ९०६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा ८ कोटी ११ लाखांच्या थकीत वीजबिलांमुळे खंडित करण्यात आला आहे.
या मोहिमेमुळे थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून बारामती परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे दि. २९ व ३० मार्चला सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केंद्रांसह घरबसल्या 'आॅनलाईन' पेमेंटसाठी महावितरणची वेबसाईट तसेच मोबाईल अ?ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.
बारामती परिमंडलातील शहरांसह ग्रामीण भागात थकबाकीदार ग्राहकांच्या वीजजोडण्या खंडित करण्याचे व सुटीच्या दिवशीसुद्धा ही कारवाई आक्रमकपणे सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच एप्रिल महिन्यातही थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू राहणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.