सोलापूर : महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २० टक्के वीज दर वाढ करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता वीज कंपन्यांकडून वीज दर वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. या विरोधात आज आम आदमी पार्टीने जिल्हा परिषदेत जवळील पूनम गेट समोर आंदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन ही दिले.
आम आदमी पार्टीचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात आज राज्यभर या आंदोलन करण्यात आले. शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की, आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३० टक्के स्वस्त वीज देवू. तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. आपल्या राज्यात २.५० ते ३.०० रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट होत आहे. ही लुट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या तीन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे. आता भाजप – शिवसेना सरकार आले आहे. त्यामुळे सर्व आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी या युती सरकारवर आहे. त्यामुळे राज्यात दि १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० टक्के अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी. मुख्यमंत्री शिंदे हे खरे शिवसैनिक असल्यामुळे ३० टक्के स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी. अशी मागणी सोलापूर शहराध्यक्ष अस्लम शेख यांनी केली.