बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर: मध्ये रेल्वे विभागातून सोलापूर रेल्वे विभागाने रेल्वे डब्यांचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण केले आहे. जवळपास ९७६ किलोमीटर रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे रेल्वे विभागाकडून वार्षिक ३५ कोटी ४८ लाख रुपयांची बचत होत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
भारतीय रेल्वे विभागाने पर्यावरणपूरक रेल्वे बनविण्याचा संकल्प केला आहे. २०३० पूर्वी नेट झिरो कार्बन एमिटर मोहीम पूर्ण करण्याचा मानस रेल्वेने केला आहे. यामुळे सर्वच गाड्यांची गती वाढणार आहे. वेळेची बचत होणार आहे. धूरदेखील कमी होणार आहे. सोलापूर विभागाने ऑगस्ट २०१४ मध्ये मनमाड, पुणतांबा, साईनगर शिर्डी असा ७३ किमी रूटचा पहिला विभाग विद्युतीकरण केले होते. सोलापूर विभागातील मध्य रेल्वेचा शेवटचा नॉन-इलेक्ट्रीफाईड सेक्शन म्हणजेच औसा रोड- लातूर रोड (५२ किमी) २३ फेब्रुवारी २०२३ मध्ये पूर्ण केला आहे. यामुळे सोलापूर विभागात एकूण तीन हजार ११६ किमीकरिता लागणाऱ्या डिझेलची बचत होत आहे. यामुळे वार्षिक ३५ कोटी ४८ लाख रुपयांची बचत होत आहे. तसेच कुर्डूवाडी लातूर विभागातील ८२६९ टन कार्बन फूटप्रिंट कमी होईल. यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही.