सोलापूर: क्रीडा संकुलात रेल्वे भरती प्रक्रियेतील उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू आहे. पाच दिवसात अकरा हजार उमेदवारांची चाचणी सुरू असून, ही प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे रेकाॅर्ड होत आहे. कुणी किती पळालं अन् तेही किती मिनिटांत याची अचूक माहिती उमेदवारांच्या दोन्ही पायांवर लावलेली चिप लगेच सांगतेय. चाचणी प्रक्रिया निर्दोष होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर होत असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी २०१८ व १९ साली रेल्वेकडून लेखी परीक्षा झाली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सध्या शारीरिक चाचणी सुरू आहे. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात चाचणी होत आहे. याची माहिती देण्यासाठी रेल्वेकडून गुरुवारी सकाळी दहा वाजता क्रीडा संकुलात पत्रकार परिषद झाली. मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक नीरज दोहरे तसेच अतिरिक्त मंडल रेल्वे प्रबंधक शैलेंद्र सिंह परिहार यांच्या नेतृत्वाखाली चाचणी सुरू आहे.