सोलापूर : सोमवारी अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यंदा जाणकारांचा अंदाज चुकवत प्रमुख महाविद्यालयांची कट ऑफ लिस्ट घसरल्याचे चित्र पहायला मिळाले. सोलापूर शहरातील प्रमुख महाविद्यालयांची विज्ञान शाखेची खुल्या प्रवर्गासाठी सर्वात जास्त कट ऑफ ही भारती विद्यापीठ ज्युनिअर कॉलेजची ९१.४० टक्के, त्यापाठोपाठ डी.बी.एफ. दयानंदची ९१ टक्के व ए.डी. जोशी, कुचन ८५ व आर.एस. चंडक ७५.२० टक्क्यावर बंद झाल्याचे पहायला मिळाले. यंदाचा कट ऑफ कमी लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदही पहायला मिळाला.
सोमवारी दुपारी ३ वाजता सर्वच महाविद्यालयात गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यंदा विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण शंभर टक्के आहे. तसेच विद्यार्थ्यांची टक्केवारीही वाढेल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत होता. पण अकरावीच्या प्रवेशासाठी प्रमुख महाविद्यालयात अर्ज संख्या कमी आली. यामुळे शहरातील प्रमुख महाविद्यालयांची टक्केवारी घसरल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, वाणिज्य शाखेची हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सची कट ऑफ ८२.४०, तर डी.ए.व्ही वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्सची कट ऑफ लिस्ट ७८.८० वर क्लोज झाला.
दरम्यान, सोमवार सकाळपासूनच विद्यार्थी व पालकांची महाविद्यालयात गुणवत्ता यादी पाहण्यासाठी गर्दी दिसून येत होती. सोमवारी गुणवत्ता यादीत नाव दिसतात काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यास ही सुरुवात केली. दुसरी यादी ३ सप्टेंबर रोजी लागणार आहे.
जिल्ह्यात एकूण ४२८ महाविद्यालये आहेत. त्यामध्ये अकरावीच्या ७६ हजार ७३६ जागा आहेत. एकूण ४० हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामध्ये विज्ञानासाठी २७ हजार, वाणिज्य आठ हजार, तर कला शाखेसाठी सात हजार अर्ज आले. यंदा दहावी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या ही जवळपास ६८ हजार आहे. अकरावीत सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.