सोलापूर : ग्रामीण भागातील लोक गट-तट आणि मतभेद विसरुन पाणी फाउंडेशनच्या वॉटर कपसाठी श्रमदान करीत आहेत. दुष्काळमुक्तीसाठी गावागावात चांगुलपणाचा वणवा पेटला आहे. या मोहिमेत शहरातील नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी पाणी फाउंडेशनने ‘जलमित्र’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत सहभागी व्हा आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करा, असे आवाहन प्रसिध्द अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत गिरीश म्हणाले, पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. २४ जिल्ह्यातील ७५ तालुक्यांतील ४ हजार गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. पाणी फाउंडेशन गावकºयांना सहभागी करुन घेते, त्यांना ज्ञान देते आणि त्यांच्याकडून श्रमदान करुन घेते.
योग्य पध्दतीच्या वैज्ञानिक दुष्टिकोनातून गावागावात कामे सुरु आहेत. ग्रामसेवक, कृषी अधिकारी मुक्कामी आहेत. पूर्वी ग्रामसेवक सापडत नव्हता. परंतु, तो आता यात सहभागी झालेला दिसतोय. जी गावे श्रमदान करीत आहेत त्यांना जलमित्र मोहिमेच्या माध्यमातून आणखी मदत मिळू शकते. शहरातील माणसांनाही यात सहभागी होता येऊ शकते. या उपक्रमाच्या घोषणेनंतर १ लाखापेक्षा अधिक जलमित्रांनी सहभाग नोंदविला आहे. १ मे रोजी महाश्रमदान करायचे आहे.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जलयुक्त शिवार अभियानाचे प्रकल्प संचालक रवींद्र माने, पाणी फाउंडेशनचे प्रकल्प संचालक नामदेव ननावरे, जिल्हा समन्वयक आबा लाड आदी उपस्थित होते.
नान्नजच्या ग्रामस्थांनी दिलाय शब्द...- गिरीश म्हणाले, मी आमच्या नान्नजला गेलो होतो. खूप कमी लोक श्रमदान करीत असल्याचे दिसले. त्याबद्दल विचारल्यानंतर पूर्वी द्राक्षाच्या बागा होत्या. बागा कमी झाल्यामुळे लोक हैदराबादला गेल्याचे सांगितले. नान्नज पूर्वी पानमळ्यासाठी प्रसिध्द होते, नंतर द्राक्ष बागांसाठी प्रसिध्द झाले. ते आता दुष्काळासाठी प्रसिध्द होणार का, असा प्रश्न ग्रामस्थांना विचारल्यानंतर त्यांनी श्रमदानात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्याचा शब्द दिला आहे.