आप्पासाहेब पाटील
सोलापूर : महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या पदरी सातत्याने निराशा येत आहे. सत्तेत आलेले प्रत्येक सरकार भरती करू अशी खोटी आश्वासने देत तरुणांना आमिष दाखविते. वर्षानुवर्ष तयारी करणाऱ्या तरुणांना भरती केव्हा याबाबतची चिंता लागली आहे. एवढेच नव्हे तर अनेकांनी आमचे तरुणपण भरतीच्या तयारीतच घालवायचे का? असा सवालही लोकमतसमोर उपस्थित केला आहे.
राज्य शासनाने १५ हजार पदांची पोलीस शिपाई भरती स्थगित केल्याचे आदेश देत १ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्याचेही सांगितले होते; मात्र महासंचालक संजय कुमार यांनी पोलीस शिपाई भरती स्थगित केल्याबाबतचे आदेश शनिवारी (२९ ऑक्टोबर) दिले. पोलीस भरतीचा पुढील दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी कळविले आहे. त्यामुळे भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे.
--------------
एवढ्या भरणार होत्या जागा
- सोलापूर शहर - १७१,
- सोलापूर ग्रामीण - ५४,
- पोलीस बल क्रमांक १० - ३३
----------
वयोमर्यादा वाढविण्याची दाट शक्यता
गेल्या तीन वर्षांत राज्यात पोलीस भरती झाली नाही. याचा फटका हजारो तरुणांना बसला. कारण वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजण पोलीस भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरत नाहीत. अशा तरुणांवर कोणताही अन्याय न करता त्यांना संधी देण्यासाठी या पोलीस भरती प्रक्रियेला थोड्या काळासाठी स्थगिती देण्यात आल्याची माहिती समिती आणि सरकारकडून समोर येत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे.
------------
चार वर्षांपासून तयारी करतोय, पुढे काय?
भरतीची घोषणा झाली. तयारी जोमाने सुरू केली; मात्र पुन्हा स्थगिती दिल्याची बातमी ऐकली अन् मन उदास झाले. एका बँकेत जॉब करीत करीत मागील तीन ते पाच वर्षांपासून भरतीची तयारी करतोय; मात्र भरतीच होत नसल्याने सरकारविरोधात चीड येते. काय आहे ते एकदा सांगून तरी टाकावं ना. सारखं सारखं आमिष कशाला दाखविता.
- विनोद चव्हाण, प्रशिक्षणार्थी तरुण
----------
गेले तीन वर्षे पोलीस शिपाई भरती प्रक्रिया झाली नव्हती. राज्य शासनाने पोलीस भरतीची घोषणा केल्यानंतर उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. उमेदवारांनी तयारी सुरू केली होती. मैदानी परीक्षेसाठी उमेदवारांनी सराव सुरू केला होता. लेखी परीक्षेची तयारी अनेकांनी केली होती; मात्र पोलीस भरती प्रक्रिया स्थगित केल्यानंतर उमेदवारांमध्ये निराशा पसरली.
- धर्मराज चिकमळ, प्रशिक्षणार्थी तरुण