सोलापूर: विकासकामांत नियोजनशून्य असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कर्मचारी बदल्यांचेही तीन-तेरा वाजविले. मंगळवारी बदली प्रक्रियेसाठी जिल्ह्याच्या कानाकोपर्यांतील कर्मचार्यांना बोलावले खरे, मात्र अपुरी माहिती व अन्य बाबींमुळे समुपदेशनाचा बट्ट्याबोळ झाला. जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचार्यांच्या बदल्यांचे वेळापत्रक प्रशासन विभागाने जाहीर केले होते. २० मेपासून सलग तीन दिवसांत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन जाहीर केले खरे, मात्र प्रत्यक्षात बदल्यांवेळी नियोजनाअभावी दांडी उडाली. ग्रामपंचायत विभागाच्या विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या ५६ बदल्या करण्याचे नियोजन होते. त्यासाठी गटविकास अधिकार्यांकडून आलेल्या माहितीच्या आधारे बदल्यापात्र कर्मचार्यांची माहिती तयार करण्यात आली होती. परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. तालुक्यातील ग्रामसेवकांच्या संख्येच्या आकृतिबंधानुसार रिक्त असलेल्या ग्रामसेवकांच्या पदाची माहिती काही गटविकास अधिकार्यांनी दिली नव्हती. त्यामुळे मंगळवारी विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकार्यांचे समुपदेशन झाले. ग्रामसेवकांची माहिती चुकीची असल्याने अचानक समुपदेशन रद्द करण्यात आले. बांधकाम खात्याचीही हीच अवस्था असल्याने बांधकाम खात्याचे समुपदेशन पुढे ढकलण्यात आले. आरोग्य खात्याच्या बदल्यांचे काम उशिरापर्यंत सुरू होते. जिल्हा परिषद विकासकामांचे नियोजन नसलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला कर्मचारी बदल्यांचेही नियोजन करता आले नाही.
---------------------------
बदल्यांचे ठिकाणही बदलले ४समुपदेशनाचे ठिकाण यशवंतराव चव्हाण सभागृह दिले असताना दुपारनंतर सीईओंच्या अँटीचेंबरमध्येच समुपदेशन उरकण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पोर्चसमोर जागा मिळेल तेथे बसलेल्या कर्मचार्यांना पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाले होते. ४उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती दालनात असूनही कर्मचारी बदल्यांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष केले ४मागील दोन महिने आचारसंहितेच्या कारणामुळे विकासकामांना ‘ब्रेक’ लावणार्या प्रशासनाने किमान कर्मचारी बदल्यांचीही तयारी केली नाही ४पदाधिकारी व सीईओंच्या बेफिकिरीमुळे कर्मचार्यांनाही होतोय त्रास
--------------------------
कोणाचा पायपोस कोणाला नाही जिल्ह्याच्या कानाकोपर्यांतून सकाळी-सकाळी कर्मचारी जि.प. परिसरात पोहोचले होते. विशेषत: आरोग्य खात्याच्या महिला कर्मचारीही सकाळीच आल्या होत्या. इकडे प्रशासनाची बदल्यांची प्रक्रिया राबविण्याची कसलीच तयारी नव्हती. त्यामुळे दिवसभर कर्मचारी ताटकळत बसले होते. ग्रामसेवकांची अर्धवट माहिती दिल्याचे कारण सांगून ग्रामसेवकांना परत पाठविण्यात आले.
---------------------------
आरोग्य खात्याच्या ३५ बदल्या आरोग्य खात्याच्या एकूण ५६ कर्मचार्यांच्या बदल्या करावयाच्या होत्या. परंतु ३५ कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या. आरोग्य सेविकांच्या १४, आरोग्य सेवकांच्या ९, आरोग्य सहायिका ३, सहायक ६, औषध निर्माण अधिकारी १, आरोग्य पर्यवेक्षक एक तर आपसी बदली एक अशा ३५ कर्मचार्यांच्या बदल्या झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी सुनील भडकुंबे यांनी सांगितले.
------------------
वेळेअभावी बांधकामच्या बदल्या पुढे ढकलल्या तर ग्रामसेवकांची माहिती अपुरी असल्याने होऊ त्या शकल्या नाहीत. या दोन्ही खात्याच्या बदल्यांचे वेळापत्रक नंतर सांगितले जाईल. - प्रभू जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी