सोलापूर : एसटी कर्मचारी आंदोलनातून हळूहळू परतत असल्यामुळे एसटी सेवा पूर्ववत होत आहे. सध्या एसटी स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत असून सोबत प्रवासाच्या आदी आरक्षण करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, औरंगाबाद, कोल्हापूर या मार्गावरही एसटी गाड्या सोडण्यात येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सोलापूर आगारात जवळपास ७० टक्के गाड्या या पूर्ववत झाल्या आहेत. कोरोनाच्या पूर्वी सोलापूर आगारातून दिवसाकाठी जवळपास साडेतीनशे ते चारशे फेऱ्या होत होत्या. त्यानंतर एसटी कर्मचारी आंदोलनावेळी या फेऱ्यांची संख्या जेमतेम २० ते तीसवर आली होती. आता ही संख्या पुन्हा वाढू लागली असून दिवसाकाठी जवळपास अडीचशे फेऱ्या सुरू झाल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील मार्गावर गाड्या सुरू झाले आहेत.
शिवाय कर्नाटक मार्गावरही एसटी गाड्या सोडण्यात येत असून सध्या विजापूर या मार्गावर गाडी सुरू करण्यात आली आहे. काही दिवसातच आता इंडी शिंदगी, गुलबर्गा या मार्गावर गाड्या सोडण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विजापूर मार्गावर सकाळी ६ वाजता सोलापुरातून गाडी निघत आहे.
ठाणे, मुंबईला सकाळी सहा वाजता गाडी
कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे आता औरंगाबाद, अहमदनगर, ठाणे, मुंबई, वाई, बसवकल्याण या मार्गावर गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. ठाणे येथे सकाळी ६ वाजता, ८ वाजता आणि रात्री ८ वाजता गाड्या सोडण्यात येत आहे तर सोलापूर ते मुंबईसाठी सकाळी ७ वाजता गाडी सोडण्यात येत आहे.
नाशिक, नांदेड मार्गावरही लवकरच धावतील गाड्या
पूर्वी ज्या मार्गावर गाड्या सोडण्यात येत होत्या, त्या मार्गांवर गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यानुसार आता नाशिक नांदेड, इंडी, गुलबर्गा या मार्गावर लवकरच गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी मार्गावर अर्ध्या तासाला एक गाडी
पूर्वीप्रमाणे पंढरपूर, अक्कलकोट आणि बार्शी या मार्गावर प्रत्येक अर्ध्या तासाला एक गाडी सोडण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांची मोठी सोय होत आहे. सध्या पंढरपूरसाठी सोलापूर आगारातून २४ गाड्या, अक्कलकोटसाठी १२ आणि बार्शी मार्गावर जवळपास १५ गाड्या सोडण्यात येत आहे. याशिवाय संबंधित आगारांच्या जादा गाड्या सोडण्यात येत आहेत.