सोलापूर: "एकच मिशन - जुनी पेन्शन" च्या प्रमुख मागणीसाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात सोलापूर महापालिकेतील कर्मचारी केवळ दुपारपर्यंत सहभागी झाले होते. दुपारनंतर मात्र महापालिकेतील बहुतांश कार्यालयात कर्मचाऱ्यांची गजबज दिसून आली. यामुळे महापालिकेत या संपाला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.
"एकच मिशन जुनी पेन्शन"चा नारा देत विविध मागण्यांसाठी १४ मार्चपासून पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संप यशस्वी करण्याचा निर्धार महापालिका कर्मचारी संघटनांनी केला होता. दरम्यान, सोलापूर महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने महापालिका आयुक्तांना यापूर्वीच निवेदन देण्यात आले होते.
दरम्यान, मंगळवारी सकाळी महापालिका कौन्सिल हॉल समोर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जोरदार निदर्शने केली. सकाळच्या सत्रात निदर्शने आंदोलन झाल्यानंतर मात्र सोलापूर महापालिकेच्या प्रशासकीय इमारत कौन्सिल हॉल सभागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये बहुतांशपणे कर्मचाऱ्यांनी गजबजलेली दिसून आली. काही कर्मचाऱ्यांनी तर सकाळीच बायोमेट्रिक हजेरी लावली होती. प्रशासकीय इमारतीतील भूमी व मालमत्ता विभाग, मुख्य लेखापाल विभाग, बांधकाम विभाग, परवाना विभाग, सामान्य प्रशासन विभाग, नगर रचना विभाग यासह बहुतांश कार्यालयात कर्मचारी काम करत असल्याचे दिसून आले.