कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा काळात केंद्र सरकारचा टपाल विभाग, एसटी महामंडळातील कर्मचारी, सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्थांतील कर्मचारी, औषध विक्रेते, कृषी सेवा केंद्र, किराणा दुकानदार, मिठाई विक्रेते, भाजीपाला, फळविक्रेते, पेपर विक्रेते अखंड सेवा देत आहेत. त्यात २० ते ४५ वयोगटातील व्यक्तींची संख्या अधिक आहे. मात्र, त्यांच्या लसीकरणाबाबत कसलाही निर्णय शासन स्तरावरून झालेला नाही.
कोरोना निर्बंधांच्या काळात हे व्यवसाय सुरू असले तरी त्यांचे काम फ्रंटलाइन वर्कर म्हणूनच सुरू आहे. एसटी महामंडळ, टपाल खाते, बँक व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची नावे फ्रंटलाइन वर्कर म्हणून आरोग्य विभागाच्या पोर्टलवर नाहीत. याकरिता संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची गरज आहे.
लसीकरणाकडे सर्वांचाच ओढा
सांगोला तालुक्यातील महसूल विभाग, आरोग्य विभाग, पंचायत समिती, नगरपालिका व पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लसीकरणाकडे सर्वांचाच ओढा वाढला आहे. मात्र, शासनाने वय, आजारपणाच्या निकषानुसार लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रंटलाइन वर्कर म्हणून काही विभागातील कर्मचाऱ्यांचे सरसकट लसीकरण केले, तर काही विभागाचे कर्मचारी लसीकरणापासून वंचित असल्यामुळे धोरणात बदल करण्याची मागणी होत आहे.