सध्या सांगोला तालुक्यात १२४ कामांवर केवळ ६२४ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
सांगोला तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रोपवाटिका, फळबाग, तुती लागवड, घरकूल अशी १२४ कामे सुरु आहेत. या कामांवर दररोज ६२४ कामगार आहेत. सामाजिक वनीकरण अंतर्गत सांगोला तालुक्यात एकही काम सुरू नाही. कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनेच्या ५५ कामांवर ३३०, तुती लागवडीच्या १८ कामांवर ९०, पंचायत समिती अंतर्गत घरकुलाच्या ५१ कामावर २०४ मजूर आहेत.
रोजगार हमी योजनेवर पूर्वी लाखो मजूर काम करायचे. मात्र आता थोड्याफार गावांमध्ये मनरेगाची कामे सुरू आहेत. मनरेगा योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना प्रति दिन २३८ रुपयांची मजुरी मिळते. या तुलनेत खाजगी कामावर मजुरांना कमीत कमी ४०० ते ५०० रुपये मजुरी मिळत असल्याने मजूर खाजगी कामांना प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसत आहे.