सोलापूर : जिल्हा गटारमुक्त व्हावा यासाठी नवीन वर्षात प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर झेडपीच्या शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच जिल्हा व तालुकास्तरावर पुरस्कार देण्याची योजना अंमलात आणणार असल्याचे झेडपीचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी सांगितले.
मावळत्या वर्षाला निरोप देताना अपूर्ण राहिलेल्या योजना पूर्ण होण्यासाठी प्राधान्य असणार आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा गटारमुक्त मोहीम घेतली. पहिल्याच टप्प्यात ६0 हजार शोषखड्डे घेण्यात आले. आता नवीन वर्षात ही संख्या लाखावर नेण्याचा मानस आहे. शाळांच्या गुणवत्ता वाढीकडे विशेष लक्ष देणार आहे. अंगणवाड्यांमध्ये दोन लाख लहान मुले शिक्षण घेत आहेत. अंगणवाडी हा प्राथमिक शिक्षणाचा पाया आहे. पण बºयाच अंगणवाड्यात सुविधांची वानवा आहे. नवीन वर्षात सर्व अंगणवाड्यांना वीज, स्वच्छतागृहे, शेगडी, पंखे आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शाळांची अशीच अवस्था आहे.
सध्या जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. आता पुढील सहा महिने टंचाईच्या कामावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. त्यामध्ये पाणी टंचाईवर विशेष काम करावे लागणार आहे. यासाठी रोजगार हमी योजनेच्या कामांना वेग द्यावा लागणार आहे. मागील चार वर्षांत रोजगार हमी योजनेची कामे मागे पडली ही वस्तुस्थिती आहे. पण या वर्षात योग्य तºहेने नियोजन करून जास्तीतजास्त कामे मार्गी लावण्याचा संकल्प आहे.
मावळत्या वर्षात सुरू केलेली कामे पूर्ण कशी करता येतील याकडे लक्ष देणार आहे. यामध्ये, घरकूल योजना, आपलं सरकार, ई-गर्व्हनर, शौचालय या कामांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीचे कामकाज पेपरलेस कसे होईल याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यात प्रायोगिक तत्त्वावर बार्शी तालुक्याचे काम सुरू आहे. सर्व खात्यातील हजेरी बायोमेट्रिकद्वारे करण्याला प्राधान्य आहे. घरकूल योजनेला गती देण्यासाठी शासनाने अतिक्रमण नियमाकुल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सोलापूर जिल्ह्यात अतिक्रमणे जास्त आहेत. या अतिक्रमणांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. आता संबंधीत भोगवटदारांना जागेचे मालकीहक्क देण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नवीन वर्षात हे भोगवटदार जागेचे मालक होतील व त्यांना नवीन घर बांधण्यासाठी घरकूल योजनेसाठी अर्ज करणे व बँक कर्ज घेणे सोपे होणार आहे.
शाळांना देणार रोख रकमेसह आदर्श पुरस्कार झेडपीच्या शाळांमधून गरीब, मध्यमवर्गीयांची मुले शिक्षण घेतात. बºयाच शाळा व अंगणवाड्यांना स्वातंत्र्य काळानंतर सुविधाच उपलब्ध केल्या नाहीत. शाळांमध्ये सुविधा उपलब्ध केल्या जातील. त्याच धर्तीवर शाळांच्या गुणवत्ता वाढीकडे कटाक्षाने लक्ष देणार आहे. नवीन वर्षात जिल्ह्यातील ३३ शाळांना रोख रकमेसह पुरस्कार देण्याचे नियोजन केले आहे. शंभर टक्के उपस्थितीसह गळती शून्यावर, डिजिटल स्कूल यावर भर देण्यात आला आहे. यासाठी १५0 मार्काची आॅनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे.