साेलापूर : शहरात ठिकठिकाणी पार्किंगची समस्या दिवसेंदिवस भेडसावत असताना आता मनपा आयुक्तांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. पार्किंगच्या जागेतील अतिक्रमण हटविण्यात येणार असून, वाहनतळांसाठी आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सांगत मनपा आयुक्ती पी. शिवशंकर यांनी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार असल्याचे नमूद केले.
पाेलिसांच्या वाहने उचलण्याच्या कारवाईविराेधात नागरिकांमध्ये राेष आहे. ‘नाे पार्किंगचा बाेर्ड लावताय, मग पार्किंगची जागा तरी सांगा?’ असा सवाल नागरिकांनी ‘लाेकमत’च्या माध्यमातून उपस्थित केला हाेता. छत्रपती शिवाजी महाराज चाैक ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैक, सरस्वती चाैक ते दत्त चाैक, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, रंगभवन ते सात रस्ता या भागात वाहतूक पाेलिसांचे क्रेन सतत फिरत असते. या भागातील दवाखाने, बॅंका, मेडिकल, शासकीय कार्यालयासमाेर लावलेली वाहने क्रेनमध्ये टाकली जात आहेत. महापालिका आणि पाेलिसांनी केवळ कारवाई न करता पार्किंगच्या जागा उपलब्ध करून द्याव्यात. यासंदर्भात एक कृती आराखडा तयार करावा, असे नागरिकांचे म्हणणे हाेते. आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, पार्किंगच्या जागा उपलब्ध करून देण्याचे नियाेजन महापालिकेने केले आहे. काेणत्या ठिकाणी पार्किंगची जागा आवश्यक आहे. यासंदर्भातील माहिती पाेलिसांकडून घेण्यात येईल. त्यानुसार आम्ही आराखडा तयार करू.
पार्किंग असेल तरच परवाना द्या
दुकान, हाॅटेल, बँक, दवाखाने यांच्यासमाेर पार्किंगला पुरेशी जागा असेल तरच त्यांना महापालिका आणि पाेलिसांनी परवाने द्यावेत. लाेकांना नाहक त्रास देण्याचे प्रकार थांबले पाहिजे. आयुक्तांनी बाेगस लेआउट प्रकरणात गुन्हे दाखल केले. पार्किंगच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत.
- शरद गुमटे, राजकीय कार्यकर्ते.
प्रथम येथे कारवाई करा
महापालिका व पाेलिसांनी प्रथम रंगभवन ते सात रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चाैक ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैक, सरस्वती चाैक ते दत्त चाैक, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय या भागात पार्किंगची जागा दिली पाहिजे. गरुड बंगल्यासमाेरील शाॅपिंग काॅम्प्लेक्सचे वापर परवाने तपासून कारवाई केली पाहिजे. पार्किंगसाठी पैैसे घेणाऱ्या माॅलविरुद्ध कारवाई केली पाहिजे.
- अविनाश भडकुंबे, राजकीय कार्यकर्ते.