पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने गेल्या आठवड्यामध्ये शहरातील विस्थापित नगर येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. या भागातील अतिक्रमणे काढताना त्या ठिकाणच्या नागरिकांना अगोदर कोणतीही सूचना न देता अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये अनेक कुटुंबीयांचे नुकसान झाले होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनी हे पाडकाम थांबवले होते. त्यानंतर नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा देखील इशारा त्यांनी दिला होता.
त्यानुसार नगरपालिकेसमोर सोमवारी सकाळी अकरा वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी विस्थापित नगर येथील बहुसंख्य गोरगरीब महिला, मुले कुटुंबासह हजर होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसेचे शशिकांत पाटील, दीपक पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते उत्तम चव्हाण, संतोष भोसले, संदीप माने यांच्यासह बहुसंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रशासनातील कोणीही अधिकारी आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आले नाहीत; मात्र पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष साधना भोसले आणि त्यांचे पती नागेश भोसले यांनी या आंदोलनकर्त्या नागरिकांची भेट घेतली. यावेळी नागेश भोसले यांनी शहरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरांची योजना सुरू आहे. त्यामध्ये नागरिकांना अल्प किमतीमध्ये घरे दिली जात आहेत. त्यामध्ये नागरिकांनी घरे घ्यावीत. शहरातील मर्चंन्ट बँकेकडून या योजनेमध्ये घरे घेणाऱ्या नागरिकांना कर्ज प्रकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.
---
फोटो : शहरातील विस्थापित नगर भागात पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये बाधित झालेल्या नागरिकांनी पालिकेसमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.
---