पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व ओळखून १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने साºया जगामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सर्वात पहिल्यांदा ५ जून १९७४ रोजी हा दिवस सबंध जगामध्ये साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून दरवर्षी पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत समाजामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी आपण सारे जण हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतोय.
युनायटेड नेशन एन्व्हॉर्नमेंट या जागतिक संस्थेच्या वतीने दरवर्षी एका देशाला पर्यावरण दिनाचं यजमानपद आणि एक विशिष्ट घोषवाक्य दिलं जातं. मागच्या वर्षी २०१८ मध्ये या दिनाचं यजमानपद आपल्या भारत देशाकडे होतं आणि त्या वर्षाची अतिशय महत्त्वाची थीम होती ‘बीट प्लास्टिक पोल्युशन’! अतिशय भयंकर अशा प्लास्टिक प्रदूषणाच्या समूळ उच्चाटनासाठी भारतासह साºया देशांनी त्या वर्षात काम केलं. वास्तविक पाहता प्लास्टिकच्या विषयावर आपण सातत्याने कृतिशील राहणे आवश्यक आहे.
२०१९ या वर्षाच्या पर्यावरण दिनाचं यजमानपद चीनकडे असून वायुप्रदूषण हा मुख्य विषय आहे. प्रदूषित वायूमुळे दरवर्षी संपूर्ण जगामध्ये जवळपास ७० लाख जीव मरतात. यापैकी ४० लाख जीव आशिया खंडातील असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. मानवाकडून केलं जाणारं कार्बन उत्सर्जन म्हणजे कार्बन फुटप्रिंट होय. उत्सर्जित किंवा बाहेर टाकलेल्या वायूमध्ये कार्बनडाय आॅक्साइडबरोबरच इतर घातक वायूंचा समावेश असतो.
‘कार्बन फुटप्रिंट’चा सर्वात मोठा स्रोत म्हणजे आज मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मोटारगाड्यांचा वापर. याशिवाय प्रत्येकाच्या घरामध्ये वापरात असलेली विद्युत उपकरणे - ए.सी., फ्रीज आणि तत्सम वस्तू आणि मानवाची आधुनिक दैनंदिनी या गोष्टी तितक्याच कारणीभूत आहेत.
कुठल्याही एका व्यक्तीच्या माध्यमातून पर्यावरणावर होणार विपरीत परिणाम मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी ‘कार्बन फुटप्रिंट’ची संकल्पना मांडली. लहान-मोठी झाडे, घराभोवती असलेली छोटी-छोटी रोपे कार्बनडाय आॅक्साईड शोषून घेऊन आपल्याला आॅक्सिजन देत राहतात. औद्योगिकीकरणानंतर हा वायू खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागला आणि त्याचबरोबर दुसºया बाजूला जंगले कमी होऊ लागली, झाडांची संख्या कमी होऊ लागली. या प्रकारामुळे वातावरण प्रदूषित व्हायला सुरुवात झाली.
जगातील ९२ टक्के लोकांना श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा मिळत नाही, हे एका सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. त्याचप्रमाणे हवेचे प्रदूषण माणसाच्या स्मरणशक्तीला बाधा आणते, त्यांना वैफल्यग्रस्त करते, असा शोध अमेरिकेच्या कोलंबस येथील ओहियो स्टेट विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. प्रदूषित हवेत श्वसन केल्याने, माणसाच्या मेंदूतील जडणघडणीवर विपरीत परिणाम होतो, असे तिथल्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगात, तिथल्या संशोधकांनी मेंदूतील हिप्पोकॅम्पस या स्मरणशक्ती, शिकणे, भावावस्था यांच्याशी निगडित असलेल्या भागाचा सखोल अभ्यास करून सदर निष्कर्ष काढलेला आहे.
वास्तविक पाहता या पृथ्वीतलावरच्या प्रत्येक सजीवाला स्वच्छ आणि शुद्ध हवा मिळणे हा त्या सजीवांचा मूलभूत हक्क आहे. आपल्या अवतीभोवतीची हवा प्रदूषित करणाºया प्रत्येक घटकाने एक क्षण थांबून विचार करण्याची ही वेळ आहे. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण सारे जण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया आणि पुढच्या पिढीला स्वच्छ आणि शुद्ध हवा मिळण्यासाठी आजच कृतिशील प्रयत्न करूया... !- अरविंद म्हेत्रे (लेखक हे पर्यावरण अभ्यासक आहेत.)