सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात भक्तीचा माहोल आहे. सुमारे दीड तास मंत्रोच्चारांच्या साक्षीनं आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या शासकीय महापूजेचा विधी पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरात आज विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली.
पहाटे अडीचच्या सुमारास मुर्तीसंवर्धनासाठी डोक्यावरुन पाण्याने तर पायावर पंचामृताचा अभिषेक पार पडला. त्यानंतर देवाला नवे वस्त्र परिधान करण्यात आले. चंदनाचा टिळा लावल्यानंतर देवाला भगरीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.. त्यानंतर रुक्मिणी मातेची पूजा झाली. शासकीय पूजा संपन्न झाल्यानंतर वारक-यांना विठ्ठल-रखुमाईचं मंदीर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. मानाचे वारकरी विठ्ठल बडे व त्यांच्या पत्नीनेही विठ्ठलाचे दर्शन घेतले.
दरम्यान, त्यानंतर रुक्मिणी मातेस वस्त्र परिधान करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. दरम्यान, आरती करून नैवेद्य दाखविण्यात आले. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर, पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे, पोलीस अधिक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला, त्यानंतर मंदिर परिसरातील स्कायवाक व इतर कामासाठी मंजुरी द्यावी अशी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचे संकट दूर कर, आनंदी, निरोगी राहू दे असे साकडे घातले. मला अशा संकटाच्या काळात विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळेल असे कधीच वाटले नव्हते अशी खंत ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
चंद्रभागेचे स्नान आणि दर्शन विठ्ठलाचे घडावे मज जन्मोजन्मी अशी प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते, मात्र यंदाच्या वर्षी कोरोना या महामारी संकटामुळे वारीत वारकऱ्यांना उपस्थित राहण्यास बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे राज्यातील प्रत्येक वारकरी हा आपल्या घरबसल्या माध्यमाद्वारे वारीची अनुभूती घेत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विठ्ठलाला साकडे
“देवा पांडुरंगा, राज्यात यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे… बळीराजाच्या शेतात, घरात समृद्धी नांदू दे… ‘कोरोना’चं संकट दूर करुन सर्वांना चांगलं आरोग्य दे… जनतेला सुखी ठेव… कोरोनाविरुद्ध लढत असलेले डॉक्टर, नर्सेस, आरोग्य-सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशाताई, पोलिस या सगळ्या कोरोनायोद्ध्यांना बळ दे.. त्यांचं संरक्षण कर… देवा विठ्ठला महाराष्ट्राचं भलं कर, राज्यावरचं प्रत्येक संकट दूर करण्याची शक्ती आम्हाला दे…” असं साकडं पंढरपुरच्या पांडुरंगाचरणी घालत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पांडुरंगभक्तांना, वारकऱ्यांना, राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.