मंगळवेढा : कपडे धुण्यासाठी गेलेल्या शाळकरी चुलत बहिणींचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. ही घटना रेड्डे (ता. मंगळवेढा) येथे शनिवारी दुपारी घडली.पूनम नागनाथ सपताळे (वय १४), पल्लवी दत्तात्रय सपताळे (वय १४) अशी मयत झालेल्या मुलींची नावे आहेत. याबाबत अकस्मात मयत म्हणून पोलिसात नोंद झाली आहे. यातील पूनम सपताळे व पल्लवी सपताळे या चुलत बहिणी असून लक्ष्मीदेवी विद्यामंदिर प्रशालेत आठवीच्या वर्गात शिकत होत्या. शनिवारी सकाळी शाळा असल्याने त्या प्रशालेत जाऊन घरी आल्यानंतर वस्तीवर लाईट नसल्याने त्या कपडे धुण्यासाठी हरी सुखदेव माने यांच्या शेतातील खड्ड्यात पावसाचे साठलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यामध्ये पाय घसरून पाण्यात पडल्याने दोघींचा बुडून मृत्यू झाला.जुलै महिन्यात या दोघींचा जवळपास अंतराने वाढदिवस होता. मात्र काळाने घाला घातल्याने त्यांचा वाढदिवस अधूरा राहिला. याबाबत नागनाथ श्रीपती सपताळे यांनी खबर दिली. तपास फौजदार अंकुश पवार करीत आहेत.
रड्डे येथे शाळकरी चुलत बहिणींचा अंत
By admin | Published: June 22, 2014 12:43 AM