सोलापूर : बदल हा निसर्गाचा नियम आहे, वर्गातील प्रत्येक तास नावीन्यपूर्ण बदलासाठी प्रोत्साहन देणारे ठरत. त्यामुळे शंभर टक्के वर्गातील उपस्थिती निश्चितच ध्येयाचा मार्ग सुकर करणारा ठरतो. जगाला कवेत घेण्यासाठी शिक्षण हा मूलभूत पाया मानला जात असला तरी, जगाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य अभियांत्रिकी शिक्षणात आहे, असे मत आय.एम.ए.पी.जी. इंडिया लिमिटेडचे संचालक आनंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी सोलापूर आयोजित ‘विचार-१८’ च्या उद्घाटनपर भाषणात आनंद कुलकर्णी बोलत होते. यावेळी पुणे येथील मेटालिस्ट फोरजिंगचे व्हा. प्रेसिडेंट किशोर भोसले, प्राचार्य डॉ.शशिकांत हलकुडे, विचार समन्वयक प्रा. मृत्युंजय मडकी, गुलबर्गा येथील पीडीए इंजिनिअरिंग कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्रकुमार हरसूर, तुळजापूर इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. एस.एम. जगदे उपस्थित होते.
यावेळी आनंद कुलकर्णी म्हणाले की, शिक्षण हे उत्क्रांतीचे साधन आहे. संशोधन हा त्याचा पाया ठरतो. महाविद्यालयातील प्रत्येक उपक्रम जीवनासाठी दिशादर्शक असतो. महाविद्यालयाच्या शिस्तीत शिकत असताना आपल्या सोयीनुसार काही गैरसमज आपण स्वत:हून पक्के करून घेत असतो, परंतु जेव्हा प्रत्यक्ष जबाबदारीच्या कार्यात यशस्वी होण्यासाठी धडपडत असता तेव्हा महाविद्यालयातील प्रत्येक शिकवण मोलाची वाटते असे कुलकर्णी यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय कंदी, महेश आवताडे, अभिजित ढेरे, सिद्धांत पांडे, वृषभ लोढा, नैतिक मंडोत, प्रदीप जगताप, आदित्य घोंगडे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. आशा थळंगे व प्रा. श्रुताली नारकर यांनी केले.
निर्मितीसक्षम शिक्षण अंगीकारणे महत्त्वाचे : हलकुडे- अभियांत्रिकी शिक्षण जगाला उभारी देणारे आहे. जगातील शिक्षणाची आव्हाने समजून घेताना अचूक विचाराचा वेध घेणारे, सातत्याने नावीन्याचा ध्यास घेणे आणि ज्ञानाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे निर्मितीसक्षम शिक्षण अंगीकारणे महत्त्वाचे आहे. शिक्षक उपस्थित प्रश्नास योग्य संक्षिप्त स्वरुपातून उत्तरे देतात. त्याचे विश्लेषणात्मक संशोधन करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरते. कौशल्य, ज्ञान, नावीन्यता याचे सादरीकरण करीत राहा असे मार्गदर्शन यावेळी प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे यांनी केले.