मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील ममदाबाद(हु )वरून शिरनांदगी तलावाकडे जाणाऱ्या ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे २५ वर्षीय उच्चशिक्षित तरुण इंजिनिअर अनिल जगन्नाथ इंगोले वाहून गेल्याची घटना तालुक्यातील महमदाबाद हु येथे गुरुवारी सायंकाळी घडली.
महिन्यांपासून सुरू असलेल्या म्हैसाळच्या पाण्याने या परिसरातील बंधारे तुडुंब भरले असून अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस झाल्यामुळे हे ओढे भरून वाहू भरून वाहू लागले आहे. या वाहत्या पाण्याचा अंदाज घेण्यासाठी हा तरुण सायंकाळी पाचच्या दरम्यान पाण्यात मासे धरण्यासाठी गेला असता त्याला त्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो वाहून गेला. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली असून उपस्थित नातेवाईकांनी त्याचा आरडाओरड करून शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान या घटनेची माहिती पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. सायंकाळच्या दरम्यान शोध कार्य करण्यास अडथळा येत असल्यामुळे शोध कार्यासाठी रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती महमदाबादचे पोलिस पाटील राजाराम कटरे यांनी मंगळवेढा पोलिसात दिली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
पंधरा दिवसात तीन घटना; चार जण मृत्युमुखी...सध्या बेसुमार पावसामुळे भीमा, माण नद्यासह गावोगावच्या ओढे नाल्याने आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. नद्या पात्राबाहेर येऊन वाहत आहेत गत महिन्यात तळसंगी येथे शेततळ्यात पाणी वाढल्याने त्याचा अंदाज न आल्याने तीन बालकाचा मृत्यू झाल्याची घटना दि १७ सप्टेंबर रोजी घडली त्यानंतर माण नदी ला पूर आल्याने मारापूर येथील सेवानिवृत्त लाईनमन बंधाऱ्यात वाहून गेल्याने दि १९ सप्टेंबर रोजी ते मृत्युमुखी पडले. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून बेसुमार झालेल्या पावसाने महदाबाद ( हु) वरून शिरनांदगी तलावाकडे जाणाऱ्या ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे २५ वर्षीय उच्चशिक्षित तरुण अनिल जगन्नाथ इंगोले वाहून गेल्याची घटना गुरुवारी घडली या घटना पाहता नागरिकांनी या पूर परिस्थितीत मोठी काळजी घेण्याची गरज आहे.