मंगळवेढ्यात कर्मचा-याला मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगोला : लक्ष्मीनगर येथे सहाजण दूध संकलन केंद्रात घुसून कंपनीच्या प्रमुखाला बेदम मारहाण करत त्याच्या खिशातील दीड लाख रुपये काढून घेतले तसेच केंद्रातील १७०० लिटर दूध सांडून नासधूस केल्याचा प्रकार घडला.
या मारहाणीत चिलींग सेंटर इन्चार्ज लक्ष्मण सिद्धेश्वर महारनवर (रा. तळेवाडी, चिकमहूद, ता. सांगोला) हे जखमी झाले असून त्यांनी सांगोला पोलिसांत फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी ९:१५ च्या सुमारास लक्ष्मीनगर येथे ही घटना घडली.
पोलिसांनी धुळा खिलारे, दऱ्याप्पा गोडसे, श्रीकांत हिप्परकर, कुंडलिक बाळू गोडसे, नामदेव बोडरे, विनायक काळेल (सर्वजण रा. लक्ष्मीनगर ता. सांगोला) या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीससूत्रांकडील माहितीनुसार जखमी लक्ष्मण महारनवर हा सांगोल्यातील लक्ष्मी कृषी विकास प्रोड्यूसर कंपनीत नुकताच चिलिंग इन्चार्ज म्हणून कामावर आला होता.
सोमवारी सकाळी सहाजण आले आणि लक्ष्मी कंपनीत जायचे नाही, म्हणून बजावले असताना का गेलास ? असा दाब देत त्यांनी दूध संकलनात केंद्रात घुसून धुडगूस घातला. त्यानंतर लक्ष्मणला शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच त्याच्या खिशातून १ लाख ५० हजार रुपये काढून घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावर न थांबता साठवून ठेवलेले १७०० लिटर दूध सांडून देऊन ४४ हजार ६०४ रुपयांचे नुकसान केले.
---
सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली घटना
लक्ष्मणला मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करण्याचा प्रकार या केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. गुन्हा दाखल करताना पोलिसांनी याची मदत घेतली असून आरोपीविरुद्ध कारवाई सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.