भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मरवडे, कात्राळ, कर्जाळ, कागस्ट, येड्राव, जित्ती, शिवणगी, आसबेवाडी, सलगर खु, हुलजंती येथील आयोजित सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी आ. गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, मरवडेचे सरपंच नितीन घुले, माजी सरपंच रजाक मुजावर, बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणवर यांच्यासह गावातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, आजपर्यंत पवार कुटुंबीयांनी राज्यातील अनेक साखर कारखाने हडप केलेले आहेत. त्यानंतर त्यांचा डोळा आता विठ्ठल साखर कारखान्यावर असल्याने त्यांचे सर्व कुटुंबीय आज प्रचारासाठी मंगळवेढा-पंढरपूर या मतदारसंघात येत आहेत.
बळीराजाकडे यांनी दुर्लक्ष केले. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान पाहणी करण्यासाठी आम्ही आज गेलो होतो. प्रचारासाठी आलेल्या एकाही मंत्र्याने पाहणी करण्यासाठी जाण्याची तयारी दर्शवली नाही.
---
यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही
ठाकरे सरकारमधील मंत्री फक्त निवडणूक आली की मते मागण्यासाठी येत आहेत. महावसुली सरकार हे कोरोनाच्या नावावर नागरिकांना कामापासून वंचित ठेवत आहे. लॉकडाऊन केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली नाही. कामगारांच्या खात्यावर ५ हजार रुपये देण्याची मागणी आम्ही केली होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. अशा ठाकरे सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचा दावा आ. प्रवीण दरेकर यांनी केला.
सध्याचे सरकार बिल्डरांना सवलती देण्यात मग्न : पडळकर
सरकारमधील मंत्री नुसते पोकळ आश्वासन देऊन जातात. मराठा समाजाच्या जीवावर आजपर्यंत यांनी राजकारण केले, पण त्यांनी आरक्षण दिले नाही. भाजप सरकारने दिलेले आरक्षणसुद्धा या ठाकरे सरकारने काढून घेतले. हा अन्याय मराठा समाजावर झाला आहे. राष्ट्रवादी म्हणजे भूलभुलैय्या पार्टी असून त्यांनी राज्यातील जनतेची दिशाभूल केली आहे. मंगळवेढा व पंढरपूर तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही जबाबदारी घेतली आहे. शेतकरी देशोधडीला लागला असताना हे सरकार बिल्डर यांना सवलत देण्यात मग्न असल्याचे आ. गोपीचंद पडळकर म्हणाले.