सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने भारत सरकारच्या भारतीय हवामानशास्त्र विभागाशी आज सामंजस्य करार केला असून, यानुसार विद्यापीठात वातावरण आणि हवामानशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. याशिवाय संशोधनाची सोयही करण्यात आली आहे. यामुळे अभ्यासक, संशोधकांना एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे.
कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस मुंबईतील भारतीय हवामानशास्त्र पश्चिम विभागाचे संचालक डॉ. सुनील कांबळे यांच्यासह विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. आर. बी. भोसले, पदार्थविज्ञान संकुलाचे संचालक डॉ. एस. एस. सूर्यवंशी, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. एस. के. पवार, डॉ. व्ही. बी. पाटील, डॉ. धवल कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रारंभी पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विनायक धुळप यांनी स्वागत केले.
यावेळी डॉ. कांबळे म्हणाले की, देशातील वातावरणाची माहिती संकलन करून त्यासंदर्भात अन्य विभागांना मार्गदर्शन करण्याचे काम भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून केले जाते.
जागतिकीकरणामुळे देश बदलला आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे माहिती गोळा करणे व माहिती मिळवणे सोपे झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागातही फार मोठे बदल झाले आहेत. अलीकडच्या काळात हवामानाविषयी अचूक माहिती देण्याचे काम या विभागाकडून होत असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.
विद्यापीठाने जर यासोबत अनेक उपक्रम राबवण्याचे ठरवल्यास विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच प्रशिक्षण, प्रोजेक्ट, कार्यशाळा तसेच रोजगाराभिमुख कार्यक्रमासाठी फायदा होणार असल्याचे डॉ. कांबळे यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस भूशास्त्र आणि पदार्थविज्ञान संकुलातील शिक्षक, विद्यार्थी, संशोधक आदी उपस्थित होते.
संशोधनासह इंटर्नशिप करण्याची संधी...- कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार असून यामुळे विद्यार्थ्यांना हवामान विभागातील बारकावे समजतील व चांगल्या प्रकारे संशोधन करण्यास एक संधी मिळेल, असे सांगितले. विद्यार्थ्यांना करार झाल्यानंतर या विभागांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधीही मिळणार आहे, असे डॉ. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.