राजकुमार सारोळे
सोलापूर : वाफेवर चालणारी रेल्वेगाडी तुम्ही पाहिली असेल, पण वाफेवर चालणारा रोडरोलर तुम्ही पाहिलाय कधी? नाही ना, तर चला मग सोलापूर महापालिकेत. महापालिकेच्या इंदभवन या ऐतिहासिक इमारतीसमोर ठेवलेला हा रोडरोलर सध्या नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
महापालिकेच्या भांडार विभागात १९४९ साली तयार झालेला हा रोडरोलर धूळखात पडून होता. १४ मे रोजी लोकमतने या ऐतिहासिक रोडरोलरच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले होते. या बातमीची दखल घेत महापौर शोभा बनशेट्टी या भांडार विभागात दाखल झाल्या व त्यांनी रोडरोलरचे महत्व ओळखून याला रंगरंगोटी करून दर्शनी भागात ठेवण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी नगरअभियंता संदीप कारंजे यांना या रोडरोलरला नवा लूक देण्याचे आदेश देण्यात आले होते.
नगरअभियंता विभागातील रस्ते विभागाचे सहायक अभियंता युसूफ मुजावर यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर तीन जणांची टीम या रोलरला नवा लूक देण्यासाठी कामाला लागली. मशिनरी विभागाचे फोरमन गिरीश पुकाळे यांनी रोलरची पाहणी करून गंजलेला भाग काढून त्या ठिकाणी नवीन पत्रा बसविला. त्यानंतर सुतार युन्नूस शेख यांनी रोलरचा गळून पडलेला टफ लाकडी फळ्यांनी सजविला. त्यानंतर पेंटर अंकुश वाघमारे यांनी भांडार विभागात शिल्लक असलेले पेंट कल्पकतेने वापरून रोडरोलरचे रूप पालटले. या कामाला २५ दिवस लागले.
दुरूस्ती व रंगरंगोटी झाल्यावर रोडरोलरचे रूप पालटले. त्यानंतर आयुक्त ढाकणे यांना याची कल्पना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या परवानगीने या रोलरला इंद्रभुवनच्या ऐतिहासिक इमारतीच्या डाव्या बाजूला जागा मिळाली. जेसीबीने ढकलत हा रोडरोलर आणण्यात आला. वाफेवर चालणारा हा रोडरोलर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तरुण वर्ग या रोडरोलरसोबत सेल्फी काढताना दिसत आहेत.
असा आहे हा रोडरोलर- टाटा मार्शल कंपनीने १९४९ मध्ये बनविलेला हा रोडरोलर आहे. याचे वजन १५ टन आहे. पाणी व दगडी कोळसा या इंधनावर हा रोडरोलर चालत होता. या रोलरला सिंगल सिलिंडर वाफेचे इंजिन आहे. यातील बॉयलरची क्षमता १00 लिटरची आहे. स्टेअरिंग रॅक अॅन्ड पिनियन टाईपचे असून, याचा वेग ताशी ५ किलोमीटर इतकी आहे.
शहरातील रस्तेकामासाठी त्यावेळच्या नगरपालिकेने ब्रिटानिया कंपनीकडून हा रोडरोलर खरेदी केला होता. १९७0 पर्यंत याचे काम चालले. नंतर सुटेभाग मिळत नसल्याने हा रोडरोलर बंद ठेवण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत भांडार विभागात तो पडून होता. आता नवा लूक दिल्याने जुनी आठवण म्हणून लोकांसाठी हा रोडरोलर औत्सुक्याचा विषय ठरला आहे.