सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून बलिदान देणारे कै. आण्णासाहेब पाटील यांचे स्मारक सोलापूर शहरात उभारण्याची मागणी स्मारक समितीने महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन यांच्याकडे केली.
स्मारक समितीचे अध्यक्ष राम जाधव यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आयुक्तांना भेटून मागणीबाबत निवेदन दिले. कै. आण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देऊन २२ मार्च १९८२ रोजी विधानभवनावर मोर्चा काढला होता. त्यांनी तत्कालीन सरकारला इशारा दिला होता. उद्या सूर्य उगवायच्या आत जर आरक्षण दिले नाही तर हा आण्णासाहेब उद्याचा सूर्य पाहणार नाही आणि त्यांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी २३ मार्च १९८२ रोजी सूर्य उगवायच्या आत मराठा आरक्षणासाठी पहिले बलिदान दिले.
माथाडी कामगार संघटना सुरू करून अठरापगड जातींच्या कामगारांना न्याय देण्याचे त्यांनी काम केले. आण्णासाहेब पाटील यांचे सोलापूरशी जिव्हाळ्याचे नाते होते. म्हणून त्यांचा पुतळा उभारण्यासाठी कुंभार वेशीत, जय भवानी शाळा परिसरात, निराळे वस्ती किंवा सोलापूर महानगरपालिकेची मोकळी जागा उपलब्ध करावी, अशी मागणी करण्यात आली.
या भेटीत आण्णासाहेब पाटील यांचा ५० फुटी पुतळा उभारा, स्मारक बांधून परिसर सुशोभीकरण करा, मराठा समाज आणि माथाडी कामगार विविध जिल्ह्यांतून स्मारक पाहण्यासाठी आल्यावर त्यांची राहण्याची व्यवस्था करावी, आण्णासाहेब यांच्या स्मारकाच्या ठिकाणी त्यांचा इतिहास काेरला जावा, अशा मागण्या केल्या.
या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष किरण पवार, समिती सदस्य उमाकांत कारंडे, विकास सावंत, ललित धावणे, राज सरडे सहभागी होते.