सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रतिज्ञापत्रावर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.
शनिवारी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. मोहिते-पाटील यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात व्यवसाय संबंधित कॉलम रिकामा सोडल्यामुळे त्यांचे प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याचा आक्षेप नाईक-निंबाळकरांनी नोंदवला आहे. म्हणणे मांडण्यासाठी मोहिते-पाटील यांनी दोन तासांची वेळ मागितली. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांना एका तासात म्हणणे सादर करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणी तीन वाजता सुरू होणार आहे.