सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास शासनाने आदेश दिले. मात्र, या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना लागणारे टायर, ऑइल, मेकॅनिक दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे विरोधाभास स्थिती आहे. सेवा-सुविधा देणारी दुकाने चालू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी वाहतूकदारांतून होत आहे.
लॉकडाऊन काळात शासन धान्य, इंधन आणि औषधे पुरवठा करण्यास परवानगी दिली. तसेच आजारी रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचता यावे म्हणून रुग्णवाहिका, रिक्षांना वाहतुकीचे नियम घालून परवानगी दिली. त्यांच्यासाठी पेट्रोल पंपांनाही परवानगी दिली. या काळात अनेक वाहने बंद पडताहेत, काही वाहनांना स्पेअर पार्ट, टायर लागतात. स्थानिक स्वराज्य संस्थांनी अर्थात मनपा आयुक्तांनी परवानगी देणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील काळात ही सेवा देण्यात अडचणी येणार आहेत.
------
रुग्णाला दवाखान्यात सोडण्यापासून ते मृत व्यक्तीला अंत्यविधीचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी रिक्षा लागते. गेल्या कित्येक दिवसांत अत्यावश्यक वाहनांची दुरुस्ती, सर्व्हिसिंग झालेली नाही. त्यामुळे पुढे सेवा द्यायची कशी? असा प्रश्न आहे.
- महिपती पवार
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी रिक्षा सेल
----
कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणे टाळता येत नाही. धान्य, औषधे, गॅस आणि शासकीय वाहनांना ऑइल, टायर, स्पेअर पार्टची गरज आहे. या घटकांना दिवसभरात चार तासांची मुभा द्यावी.
- सलीम मुल्ला,
राज्य सचिव, सिटू
---
शहरातील अत्यावश्यक वाहनांची संख्या लाखांत आहे. मात्र, त्यांना सेवा देणाऱ्या टायर, मेकॅनिक यांची दुकाने खूप कमी आहेत. अत्यावश्यक काळात इतर घटकांना परवानगीची मागणी शासनाकडे केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
- उदयशंकर चाकोते
सदस्य, ऑल इंडिया काँग्रेस ट्रान्सपोर्ट असोसिएशन
----
सोलापुरात मालवाहतुकीची वाहने ही लाखांच्या घरात आहेत. कोरोना काळात गॅरेज, ऑइलची दुकाने चालू हवीत. केवळ माणसांच्या वाहतुकीला बंदी आहे. आज ३० टक्के वाहतूक बंद आहे. स्थानिक स्वराज संस्थांनी या प्रश्नावर विचार करावा.
- संजय डोळे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
---
स्पेअरपार्ट विक्रीला बंदी आहे. चालू ठेवल्यास पोलिसांकडून दहा हजारांचा दंड होतोय. अनेक वाहतूकदारांकडून सुट्या भागांची चौकशी आणि मागणी होत आहे. मात्र, स्थानिक स्वराज संस्थेच्या जाचक नियमात व्यवसाय अडकला आहे.
- संजय राऊत
ॲटोमोबाइलचालक
---
आरटीओकडील नोंदीत वाहने
मोटरसायकल : ६,८३,०६६
स्कूटर : ७,७९,९१७
मोपेड : ७२,४७२
दुचाकी : ८,३३,५२९
मोटर कार : ५२,९५४
जीप : १,४१,०१९
टॅक्सी कॅब : १,१८२
ऑटो रिक्षा : १७,७०८
कंटेनर कॅरियर /मिनी बस : १७५
स्कूल बस : ७२२
प्रायव्हेट सर्व्हिस व्हेइकल्स : १००
मल्टी व्हेइकल्स : ९३ बुक्स अँड लोरीज : ११,७४६
टँकर्स : १,१५५
डिलिव्हरी व्हॅन चारचाकी : १९,९९०
डिलिव्हरी व्हॅन तीनचाकी : ७,९५१
ट्रॅक्टर : ३३,५८९
टूलर्स : १४,५२८
इतर वाहने : ७९०