माळशिरस तालुक्यातील कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीस आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अति. जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार जगदीश निंबाळकर, पोलीस उपअधीक्षक निरज राजगुरू, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष खडतरे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार आदी उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यात २५ पेक्षा अधिक कोविड रुग्ण असणारी २८ गावे आहेत. अकलूज, वेळापूर, नातेपुते, दहिगाव, माळशिरस, माळीनगर, यशवंतनगर या गावात १०० पेक्षा अधिक कोविड रुग्ण आहेत. काही रुग्ण होमक्वारंटाइन होत असल्याने त्याचा घरातील इतर व्यक्तींवर परिणाम होऊन कोरोना केसेस वाढत आहेत. घरात विलगीकरण असलेले रुग्ण बाहेर काढून त्यांना आयसोलेशन कक्षात ठेवणे गरजेचे आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखता येईल, यासाठी गावातच विलगीकरण कक्ष स्थापन करावेत, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
यावेळी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते यांनी तालुक्यासाठी पुरेसा औषधसाठा, लस, ऑक्सिजन, रुग्णवाहिका उपलब्ध कराव्यात, आरोग्य कर्मचारी भरावेत, अशी मागणी केली. तसेच तालुक्यातील अधिकारी व डॉक्टरांनी आपल्या अडचणी मांडल्या.