प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अमोल कुंभार, मंद्रुपच्या अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे, गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा ध्यास घेतला होता. त्यांनी तालुक्यातील साखर कारखाने आणि सेवाभावी संस्थांना हाक दिली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आचेगाव येथील जयहिंद शुगर्सने प्रतिसाद दिला. बोरामणी परिसरात एका शिक्षण संस्थेने जागा उपलब्ध करून दिली.
बसवनगर येथे ३० तर बोरामणीत २५ बेडचे हॉस्पिटल
जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने-देशमुख यांनी ३० बेडचे हॉस्पिटल उभारण्यासाठी आर्थिक सहकार्य देण्याची तयारी दर्शविली. बसवनगर येथील श्रीकृष्ण हॉलमध्ये हे हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. बोरामणी येथील ग्लोबल व्हिलेज शिक्षण संस्थेच्या इमारतीत २५ बेडचे हॉस्पिटल उभारण्यास संस्थेने मान्यता दर्शविली आहे.
मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयाची अडचण
सध्या मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन या रुग्णालयातही कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी वाढत आहे. प्रशासनाने त्यासाठी चाचपणी केली. मात्र, या रुग्णालयाचे रूपांतर कोविड केअर सेंटरमध्ये केल्यास नॉनकोविड रुग्ण, प्रसुती, किरकोळ सामान्य उपचाराची व्यवस्था कोठे करायची असा प्रश्न आहे. कोविड सेंटर सुरू केल्यास त्यासाठी स्वतंत्र आरोग्य कर्मचारी पुरवावे लागतील.
सेवाभावी संस्थाही सरसावल्या
डॉक्टर, कर्मचारी शासनाचे
साखर कारखाने आणि सेवाभावी संस्थांनी कोविड केअर सेंटरची उभारणी करताना त्यासाठी लागणारे बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर इत्यादी पायाभूत सुविधा पुरवाव्यात. डॉक्टर, कर्मचारी आणि अन्य स्टाफ शासनाचा असेल. औषध पुरवठा शासन करणार आहे.
कोट
::::::::
कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तालुक्यातील साखर कारखानदार, सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी यांना आवाहन करून त्यांची मदत घेतली जाईल.
- उज्ज्वला सोरटे ,
अप्पर तहसीलदार,
मंद्रुप अतिरिक्त तहसील कार्यालय