पंढरपूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या प्रस्तावित संत तुकाराम महाराज संतपीठासाठी प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली १५ जणांची मार्गदर्शक समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे. ही समिती संतपीठाचा बृहत आराखडा, अभ्यासक्रम, आस्थापनेची रचना, वर्गपद्धती व इतर अनुषंगिक कामांच्या विषयी मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
या संतपीठासंदर्भात माहिती देताना डॉ. भोसले म्हणाले, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाला येणाºया भाविकांना संत वाङ्मय व भागवत धर्माची शिकवण देण्यासाठी हे संतपीठ उभारणे आवश्यक आहे. संतपीठाची लवकरात लवकर उभारणी व्हावी, अशी मागणी वारकºयांमधून सातत्याने होत होती. मानवतावाद व सामाजिक समता याविषयी उपदेश केलेल्या सर्व संतांच्या शिकवणीतील भावार्थ, सिद्धांत व तत्त्वज्ञान या संबंधीचे ज्ञान देण्यासाठी ते आचरणात आणण्यासाठीचे शिक्षण देण्यासाठी तसेच त्याचा प्रचार करण्यासाठी संतपीठाची उभारणी करण्यात येणार आहे.
या महत्त्वाकांशी संत तुकाराम महाराज संतपीठाचा बृहत आराखडा, अभ्यासक्रम, आस्थापनेची रचना, वर्गपद्धती व इतर अनुषंगिक कामासाठी मार्गदर्शक समितीची गरज होती. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाली त्यांनी पुढील नामवंत व्यक्तींची मार्गदर्शक समिती नियुक्त करण्यास तत्वत: मान्यता दिली आहे.
७ सप्टेंबरच्या सभेत दिली होती मंजुरीदरम्यान, पंढरपूर मंदिरे अधिनियमामध्ये संत तुकाराम महाराज संतपीठ स्थापन करण्याविषयीची तरतूद आहे. तथापि अनेक मंदिर समित्या होऊन गेल्या पण संतपीठ अस्तित्वात आले नाही. मागील वर्षी डॉ. अतुल भोसले यांनी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर पंढरपूर मंदिर अधिनियमातील तरतुदीनुसार आपण संतपीठाची निर्मिती करण्यास प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केलेले होते. त्यानुसार ७ सप्टेंबर रोजी झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत संत तुकाराम महाराज संतपीठ या नावाने परिसंस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती.
मार्गदर्शक समितीमधील नियुक्त सदस्य च्डॉ. विजय भटकर (अध्यक्ष), डॉ. अरुणा ढेरे, विवेक घळसासी, डॉ. सदानंद मोरे, गणेश सुर्वे, शंकर अभ्यंकर, यशवंत पाठक, डॉ. सुभाष लोहे (विदर्भ स्टडी आॅन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज), अरविंदराव देशमुख (अमरावती), शांताराम बुटे (अकोला), विद्याधर ताठे, डॉ.एल.के.मोहरीर (औरंगाबाद), ज्ञानेश्वर महाराज देशमुख (जालना), रामचंद्र देखणे आणि चैतन्य महाराज देगलूरकर.