सोलापूर : मंगळवेढाजवळील कृषी विभागाच्या ६५ एकर जागेपैकी १५ एकर जागेवर महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक तर उर्वरित जागेत कृषी पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. या संदर्भातील आराखडा जिल्हा नियोजन विभागाकडून सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
मागील महिन्यात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत बसवेश्वर स्मारकासाठी आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, बसवेश्वर स्मारकाबाबत सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्मारकाचा आराखडा सादर करण्यात आला. कृषी पर्यटन केंद्राचा आराखडाही सादर झाला आहे. तो शासनाकडे पाठविण्यात येईल. --------------------विमान प्राधिकरणाने सुचवावी जागा- होटगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरु करण्यास अडथळा ठरणारी सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी हटविण्याचे आदेश विमानतळ विकास कंपनीने दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने कारखाना प्रशासनाला पर्यायी चिमणी उभारण्याची सूचना केली आहे. त्यावर कारखाना प्रशासनाने नवी चिमणी उभारण्यासाठी आता विमानतळ विकास कंपनीने कारखान्यातील दुसरी जागा सुचवावी, असे पत्र दिले आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळ विकास कंपनी आणि सिध्देश्वर सहकारी कारखाना यांची संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सांगितले.