सोलापूर: ब्राझीलमध्ये इथेनॉल सुरू झाल्यानंतर भारतात इथेनॉल सुरू होण्यासाठी ७० वर्षे का लागली?, पामतेल आयात करून आपल्या देशातील तेलघाणे काँग्रेसच्या सरकारने गायब केले, असा घणाघाती आरोप कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशाभाई पटेल यांनी मार्डी येथे बोलताना केला.
भाजप-सेना युतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या प्रचारासाठी मार्डीत झालेल्या सभेत ते बोलत होते. जगात इंधन आयात करणाºया देशात सर्वाधिक इंधन आयात करणारा देश भारत असल्याचे सांगत पटेल यांनी आकडेवारीच सादर केली. ब्राझीलमध्ये १९३१ मध्ये इथेनॉल तयार होऊ लागले, ते भारतात २००१ मध्ये सुरू झाले. शेतकºयांचा कळवळा असलेल्या काँग्रेसने इथेनॉल तयार करण्यासाठी ७० वर्षे का लावली? असा सवाल पटेल यांनी विचारला.
शरद सूत गिरणी कोण बंद पाडली?, उत्तर सोलापूर तालुका खरेदी-विक्री संघाची मालमत्ता कोण विकली?, जिल्हा बँकेचे कर्ज सोसायटीतून कोणाच्या बगलबच्च्यांना मिळते?, शिरापूरचे पाणी १५ वर्षे तालुक्याला का मिळाले नाही?, बाजार समितीच्या बैठकीत ५६ विषय अडीच मिनिटात मंजूर कसे होतात?, याची उत्तरे तालुक्यातील काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांना विचारा, असे आवाहन उपस्थितांना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, अनुसूचित जाती समितीचे अध्यक्ष सुभाष पारवे, भारत जाधव यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख शहाजी भोसले, सुधीर गोरे, सभापती संध्याराणी पवार, इंद्रजित पवार, शिवाजी सोनार, राजू हौशेट्टी, राजू सुपाते, श्रीमंत बंडगर, काशिनाथ कदम आदी उपस्थित होते.
कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा आम्हाला विश्वास- रणजितसिंह अनेक वर्षे मागणी असलेला मार्डीतून जाणारा सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग याच सरकारने मंजूर केला, पूर्वी केंद्राने एक रुपया पाठविला तर गावात १५ पैसे येत होते, आता संपूर्ण रुपया गावात येतो, असे सांगत कृष्णा-भीमा स्थिरीकरण झाले तरच शिरापूर उपसा सिंचनचे पाणी तुम्हाला मिळणार आहे, हे काम करण्याचा आम्हाला विश्वास असल्याचे माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.