सोलापूर : गेल्या वर्षी कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्याच वर्षी ५० टक्के गारमेंट उद्योग बंद पडला. या वर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शाळा सुरू होण्याची चिन्हे नाहीत. गेल्या वर्षी कसाबसा तग धरून राहिलेल्या उर्वरित ५० टक्के गारमेंट उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शाळा बंदचा फटका गारमेंट उद्योजकांना बसला असून, २० हजार कामगारांसमोर संकट उभे राहिले आहे.
शाळा सुरू न झाल्यास सोलापूर गारमेंट उद्योगाची वाटचाल शून्य मार्केटकडे निश्चित असणार आहे. यामुळे गारमेंट उद्योगातील २० हजार कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल, अशी माहिती सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे सहसचिव प्रकाश पवार यांनी लोकमतला दिली.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे येथील गारमेंट उद्योजक मार्केटिंगसाठी मागील वर्षभरापासून बाहेर पडलाच नाही. त्यामुळे नवीन ऑर्डर्स त्यांच्या हाती नाहीत. शाळा लवकरात लवकर सुरू होतील, या आशेवर काही गारमेंट उद्योजकांनी शालेय गणवेश तयार ठेवले.
ऑर्डर मिळाल्यानंतर तयार गणवेशाचा पुरवठा करता येईल, ही त्या मागची भूमिका होती. परंतु मागच्या वर्षी आणि यावर्षी शाळा बंद असल्यामुळे तयार गणवेश पडून आहेत. उत्पादनातील गुंतवणूकदेखील पडून आहे. नवीन गुंतवणुकीकरिता भांडवल नाही.
नवीन ऑर्डर्स नाहीत. यामुळे काही गारमेंट उद्योजक फक्त तीन दिवस कारखाने चालू ठेवताहेत. मागच्या वर्षी जवळपास दीडशे गारमेंट्स युनिट बंद राहिले. सध्या शंभर ते दीडशे युनिट सुरू आहेत. यातील पन्नास युनिट्स कधीही बंद पडू शकतात. शाळा लवकरात लवकर सुरू न झाल्यास उर्वरित ५० टक्के युनिट्सदेखील बंद पडतील, अशी भीती गारमेंट उद्योजकांनी व्यक्त केली.
उद्योजकांना बाहेर जाता येईना...
महाराष्ट्र पुन्हा एकदा कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरतोय. त्यामुळे बाहेरचा व्यापारी महाराष्ट्रात येईना. दुसरी बाब म्हणजे परप्रांतात जाण्याकरिता जाचक अटी आहेत. त्यामुळे सोलापुरातला व्यापारीही बाहेर जाईना. काम नसल्यामुळे अनेकांनी गारमेंट युनिटमधील शिलाई मशीनरी विकल्या. सोलापूरची ओळख गारमेंट हब म्हणून निर्माण झाली आहे. उद्योग अडचणीत सापडला आहे.
- प्रकाश पवार, सहसचिव-सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशन
आकडे बोलतात
- नोंदणीकृत गारमेंट कारखानदार - ३०० ..........
- सध्या सुरू गारमेंट युनिट्स - १५० .........
- एकूण कामगार - २०,००० ...........
- कोरोनापूर्वीची युनिफॉर्म उलढाल - ३०० ते ४०० कोटी