सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या बदलीनंतर १८ दिवस पूर्ण झाले; मात्र अद्याप नवीन अधिकाºयांची नियुक्ती झाली नाही. विविध नावांची चर्चा होत आहे; मात्र खात्री नाही त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. मराठा आंदोलनानंतर मनोज पाटील यांनी सोलापूरच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडे सोपवला. त्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलीस दलाच्या निरोप घेऊन अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. नवीन पोलीस अधीक्षक म्हणून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा पदभार कोण घेणार? याची उत्सुकता सध्या राजकीय-सामाजिक गुन्हेगारी व अवैध धंद्यातील लोकांना लागून राहिली आहे.
महाआघाडीतील नेत्यांची धडपडमहाराष्ट्राच्या गृहविभागाने दि. १७ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली झाली. सोलापूरच्या पोलीस अधीक्षकपदी येण्यासाठी अनेक अधिकारी इच्छुक आहेत. सध्या राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता आहे. ग्रामीण भागातून राष्ट्रवादी व शिवसेनेच्या राजकीय नेत्यांनी त्यांना हवा असलेला पोलीस अधीक्षक जिल्ह्याला देण्याची मागणी केली असल्याची चर्चा होत आहे.
दोन दिवसात आॅर्डर निघण्याची शक्यता?शासनाने बदल्यांची मुदत दि. १५ आॅक्टोबरपर्यंत वाढवली आहे. मात्र पोलीस अधीक्षकांच्या नियुक्तीबाबत गृहविभागाकडून पुढील दोन दिवसांमध्ये आॅर्डर निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लातूरचे राजेंद्र माने, सातारा येथील तेजस्विनी सातपुते, तुषार जोशी यांच्या नावाची चर्चा होती. यापैकी एक अधिकारी येणार की अन्य दुसराच कोणी पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त होणार हे आगामी काळातच समजणार आहे.