सांगोला : युती सरकारच्या काळात उजनीतून मंजूर झालेले २ टीएमसी उचल पाण्याचे भूमिपूजन झाले खरे, मात्र २१ वर्षांनंतरही सांगोल्याला पाणी मिळालेच नाही. काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप-शिवसेनेचे मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री झाले. मात्र, उजनीतून सांगोल्याच्या उचल पाण्यासाठी निधीची तरतूद केलीच नाही. २१ वर्षांपासून निधीअभावी योजनाच रखडल्याने उजनीचे उचल पाणी सांगोल्यासाठी मृगजळ तर ठरणार नाही ना? अशी चर्चा आता शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.
शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिवंगत मंत्री महादेव शिवणकर यांच्याकडे सतत पाठपुरावा करून उजनीतून दोन टीएमसी उचल पाणी योजना मंजूर करुन घेतली होती. त्यांच्या कालावधीत विधानसभा बरखास्त झाली. दरम्यान, २००० साली दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते व तत्कालीन लोकप्रतिनिधी गणपतराव देशमुख यांच्या उपस्थितीत उजनीच्या उचल पाण्याचे साळमुख (माळशिरस) याठिकाणी भूमिपूजन झाले.
त्यानंतर गणपतराव देशमुख तब्बल तीनवेळा विधानसभेत निवडून गेले. त्यांच्या कालावधीत म्हणजेच २१ वर्षांत या योजनेला १ रूपयाही आर्थिक मदत न मिळाल्याने ही योजना अद्याप कागदावरच आहे. दरम्यान, २०१३ साली या योजनेसाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात १० कोटींची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात तरतूद केलीच नाही. त्यामुळे गेल्या २१ वर्षांत ही योजना निधीअभावी रखडली व योजनेतील लाभार्थी आजपावेतो पाणी... पाणी... करत आहेत.
२१ वर्षांत मिळाली केवळ आश्वासने
मागील २१ वर्षांच्या काळात सांगोला तालुक्यात पाण्यासाठी अनेकदा पाणी परिषदा, रस्ता रोको आंदोलने झाली. मात्र, उजनीच्या उचल पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाच नाही. महाराष्ट्रातील आजी-माजी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री सांगोल्यात येऊन शेतीच्या पाण्याचा प्रश्न व टेंभू-म्हैसाळ, उजनी उचल पाणी योजनेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, म्हणून आश्वासने देऊन गेले. मात्र, मुंबईत गेल्यावर त्यांना घोषणांचा विसर पडला. साधे फाईलकडे पाहण्यासाठीही वेळ मिळाला नाही.
उजनीच्या पाण्यावरून राजकारण तापलेलेच
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांडपाण्याच्या नावाखाली उजनीतून ५ टीएमसी पाणी मंजूर करून घेतले. त्यामुळे उजनीच्या पाण्यावरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. असे असताना सांगोल्याच्या मंजूर दोन टीएमसी पाण्याचे काय झाले, अशी चर्चा सध्या सांगोल्यात शेतकऱ्यांमधून सुरू आहे. ही योजना मंजूर होऊनही आजपर्यंत मार्गी लागली नाही. त्यामुळे तत्कालीन नेतृत्व कमी पडले की? सरकारची उदासिनता याचे कोडे अद्याप सुटलेले नाही.
फोटो ओळ :::::::::::::::::::
२१ वर्षांपूर्वी साळमुख येथे झालेल्या उजनी उचल पाण्याच्या भूमिपूजन कोनशिलेचे छायाचित्र.