सोलापूर जिल्ह्यासह पुणे व नगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलवणारे उजनी धरण ४० वर्षांत ३४ वेळा शंभर टक्के भरले आहे. चालू वर्षी मात्र पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटात दमदार पाऊस झाला नसल्याने उजनी धरण भरण्यास वेळ लागत आहे. शेतकरी व साखर कारखानदारीच्या दृष्टीने ही काळजीची बाब आहे. मात्र, उजनी धरणाच्या वरील बाजूस भीमा नदीवर असलेली पुणे जिल्ह्यातील दोन- तीन धरणे वगळता बहुतेक धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर परतीच्या पावसाने थोडा जोर धरला तरी उजनीच्या वरील धरणे भरल्याने ते पाणी सरळ उजनी धरणात येऊ शकेल व उजनी शंभर टक्के भरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
उजनी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १२३ एवढी प्रचंड आहे. धरण शंभर टक्के भरले, असे आपण म्हणतो तेव्हा धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा असतो तर १११ टक्के भरलेले असते तेव्हा १२३ टीएमसी पाणीसाठा असतो. उजनी धरण महाराष्ट्रातील सर्वांत मोठे पाणीसाठा असलेले धरण असले तरी तिसऱ्या क्रमांकाचे उपयुक्त पाणीसाठा असलेले धरण आहे. उजनी धरणाची पाणीसाठवण क्षमता १२३ टीएमसी असली तरी उपयुक्त साठा मात्र ५३.५७ टीएमसी एवढाच आहे.
सध्या उजनी धरण ८३ टक्के भरले आहे म्हणजे उपयुक्त जलसाठा ४४.४० टीएमसी एवढाच आहे. म्हणजे ५३.५७ टीएमसी एवढा उपयुक्त जलसाठा होण्यासाठी धरणात आणखी ९.१० टीएमसी पाणी येणे गरजेचे आहे.
काटेकोर नियोजन हवे
दुर्दैवाने धरण शंभर टक्के भरले नाही, तर मात्र भविष्यात धरणातील पाण्याचे शेती, औद्योगिक वसाहती तसेच पिण्यासाठी काटेकोर नियोजन होणे गरजेचे आहे. उजनी धरणातील ५३.५७ टीएमसी जलसाठ्यातूनच डाव्या व उजव्या अशा तब्बल ४३२ किमी कालव्याद्वारे जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. डाव्या कालव्याद्वारे ९६ हजार हेक्टर तर उजव्या कालव्याद्वारे ९१ हजार ८०० हेक्टर क्षेत्राला पाणी दिले जाते. याचबरोबर भीमा-सीना बोगदा योजना तसेच सीना-माढा उपसा सिंचन या योजनांद्वारे जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या सर्व योजनांमुळे माढा, माळशिरस व पंढरपूर या तालुक्यांत उसाचे क्षेत्र वाढवून हरितपट्टा तयार झाला आहे. उजनी धरणाच्या पाणीसाठ्यावरच जिल्ह्यातील सुमारे ४० साखर कारखान्यांचे व त्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे.