अमावस्या संपली तरी म्हेत्रे यांच्यापाठीमागील विघ्न हटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:38 PM2019-10-01T12:38:13+5:302019-10-01T12:41:23+5:30
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ; काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम
अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभेसाठी मागील दोन महिन्यांपासून आ. सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रवेशाचे काही कळेनासे झाले आहे. म्हेत्रे यांच्या भाजप प्रवेशाची आशा अजूनही संपलेली नाही. रोज येणाºया वेगवेगळ्या बातम्यांमुळे काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम आहे.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून मागील दोन महिन्यांपासून आ. सिद्धाराम म्हेत्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरू आहेत. या सगळ्या बाबींवरून म्हेत्रे यांचा पक्ष प्रवेश, उमेदवारी सहज मिळेल असे सर्वांना वाटत होते. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. सोमवारी प्रवेश निश्चित होणार अशी बातमी सोशल मीडियाच्या सर्व ग्रुपवर फिरत होती. यामुळे म्हेत्रे समर्थक संभ्रमात आहेत. सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह कायम आहे.
रविवारी दुपारपासून सोमवारपर्यंत म्हेत्रे यांचा भाजप प्रवेश होणार आहे अशी चर्चा होती. म्हेत्रे मुंबईकडे रवाना झाल्याचे सांगण्यात येत होते. या सगळ्या घडामोडीत आ. म्हेत्रे यांना काहीच माहिती नसल्याचे त्यांनी स्वत: कबूल केले. हे नेमकं चाललंय काय? या बाबत काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षातील कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. त्या आधारे सोमवारी दुपारी आ. म्हेत्रे हे सोलापूर येथे विविध नेत्यांबरोबर चर्चा करीत होते.
भाजपमध्ये प्रवेश मिळेल या अपेक्षेने आ. म्हेत्रे वाट पाहत आहेत. म्हेत्रेंना प्रवेश न मिळाल्यास ते काँग्रेसमधून लढतील अशी अपेक्षा पक्षाला आहे. आ. म्हेत्रे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्यास माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा यांचे नाव पुढे येत आहे. त्यांनीही नकार दिल्यास मूळचे दुधनीचे व कलबुर्गी महानगरपालिकेचे माजी उपमहापौर संतोष पाटील यांचे नाव पुढे येत आहे.