सोलापूर : मागील वर्षभर मुंबई, शेटफळ, पंढरपूर येथील मालकीच्या जागा विक्री करण्यात अपयश आल्यानंतर फेरमूल्यांकनावर संचालक आले आहेत. दरम्यान, वर्षभरात दूध संकलन लाख लिटरच्या जवळपास आले असले तरी पॅकबंद पिशवीतील दूधविक्री वाढविण्यास मात्र अपयश आले आहे.
दि. ८ मार्च २०२२ रोजी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे व व्हाईस चेअरमन दीपक माळी यांची निवड करण्यात आली. निवडीच्या सभेत चेअरमन शिंदे यांनी मुंबईची जागा विक्री करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. त्यानंतर मुंबईच्या जागेच्या विक्रीसाठी अनेक वेळा व किंमत ४६ कोटी रुपयांवरून २८ कोटी ८० लाख रुपये इतकी खाली आणण्यात आली. वारंवार ई- लिलाव व जाहीर लिलावासाठी कोणीही पुढे आले नाही. संघाच्या पदाधिकाऱ्यांचे एक वर्ष केवळ मुंबई, अक्कलकोट, पंढरपूर व शेटफळ येथील जागा विक्रीसाठी टेंडर काढण्यात गेले आहे.
संघावर प्रशासक असताना मुंबईच्या जागेचे मूल्यांकन ४६ कोटी इतके झाले होते. संचालक मंडळाच्या कालावधीत मूल्यांकन २८ कोटी ८० लाखांवर आणले. मात्र जागा खरेदीसाठी कोणीही पुढे आले नाही. आता फेरमूल्यांकन करून जागा विक्रीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले.
प्रशासकाच्या कारकिर्दीत (मार्च २२) मध्ये १७ हजारांवर आलेले संकलन आता ८५ हजारांवरती आले आहे. जवळपास एक लाख लिटरवर संकलन पोहोचले. मात्र पिशवीबंद दूध विक्रीत मोठी घट झाल्याचे दिसत आहे. पिशवीतील ११ ते १३ हजार लिटर दूध विक्री होत असल्याचे सांगण्यात आले.बल्क कुलर सेंटर सुरू करूअक्कलकोट, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील दूध सध्या केगाव येथील शीतकरण केंद्रात संकलन होते. तीनही तालुक्यांत बल्क कूलर सुरू करण्याबाबत चर्चा झाली. वडाळा, बिबीदारफळ, मंद्रूप या किंवा इतर अधिक दूध संकलन असलेल्या गावांत बल्क कुलर सेंटर सुरू करण्यात येईल, असे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले.