जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सीमा दोडमणी यांच्या बदलीचे आदेश दिले होते. बदली होऊनही डॉ.दोडमणी या सांगोल्यात कर्तव्यावर असल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. यावेळी डॉ.सीमा दोडमणी यांनी सांगितले की, माझ्या बदलीची ऑर्डर व्हॉट्सॲपवर आली आहे. मेल व हार्ड कॉपी मिळाली नाही. बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायचं की नाही, याबाबत विचार सुरू आहे. कोठेतरी नोकरी करायची आहे, आज ना उद्या बदली होणारच आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रत्यक्षात पदभार सोपवलाच नाही
तालुका आरोग्य अधिकारी सीमा दोडमनी यांची बदली झाल्यानंतर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांनी अकोला (वा) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप देवकाते यांना तेथील पदभार संभाळून तालुका आरोग्य अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पदभार सोपविल्याचे बदली पत्रात नमूद केले होते. मात्र, प्रत्यक्षात डॉ.संदीप देवकाते यांच्याकडे पदभार सोपविलाच नाही, त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.