शिवानंद फुलारी
अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाºया कारंजा चौक ते वीज वितरण कंपनी कार्यालयापर्यंतचा रस्ता दीड वर्ष उलटून गेले तरी अद्याप पूर्ण झाला नाही. यासाठी नगरपालिका प्रशासनासह पदाधिकारी ठेकेदारांना जाब विचारत नसल्याचाच हा परिणाम आहे. यामुळे शहरवासीयांची मात्र मुस्कटदाबी होत आहे.
अक्कलकोट शहरात प्रवेश करणारा हा रस्ता नादुरुस्त व अर्धवट स्थितीत असल्याने बायपासवरून राजवाड्याच्या पाठीमागील चढण्याच्या कच्च्या रस्त्यावरून जावे लागत आहे. हा पर्यायी मार्गही खडतरच आहे. इतका त्रास होत असतानाही सगळेच चिडीचूप असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वारंवार रस्त्यावर खड्डे पडत असल्याने शासनाने सात कोटी रुपये मंजूर केले; मात्र हा रस्ता सतरा महिने उलटले तरी पूर्णत्वाकडे जाताना दिसत नाही.
पूर्वीच्या खराब रस्त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. कसेबसे दोन वर्षांपूर्वी युती शासनाने सात कोटी रुपये निधी रस्ता बांधणीसाठी दिले. त्यानंतर ई-टेंडरमध्ये सोलापूर येथील पाटील अँड पाटील या कंपनीला ठेका मिळाला. तत्काळ कामाला सुरुवातही केली. सर्व रस्ता जेसीबीने उखडून टाकला. त्यानंतर ज्या पद्धतीने गतीने रस्ता बांधणी काम होणे गरजेचे होते. ते होताना दिसत नाही. यामध्ये नगरपालिका अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार यांच्यात समन्वय राहिला नाही. म्हणून कोणाचा कोणावर वचक राहिलेला नाही. परिणामी दीड वर्षानंतरही हा रस्ता अपूर्ण आहे.
या रखडलेल्या रस्त्यामुळे या मार्गावरील व्यापाºयांना धुळीचा त्रास होत आहे. याबरोबर त्यांचा दैनंदिन व्यापाºयांना फटकाही बसला आहे. सर्वात कहर म्हणजे या मार्गावरून ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर, आंबेडकर जयंती, शिवजयंती, मोहरम, रमजान, गणपती अशा विविध धार्मिक यात्रा, उत्सवाप्रसंगी कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाला जिकिरीचे होऊन बसले आहे. शासनाच्या धोरणानुसार रस्ता नवीन बांधणी करीत असताना दर्जेदार होणे अपेक्षित आहे; मात्र नियमांना बगल देत, अतिक्रमणधारकांना अभय दिल्याचे समोर येत आहे.
अतिक्रमणधारकांची मर्जी राखण्याचा प्रयत्न- या मार्गावरील व्यापाºयांचे धुळीने आरोग्याबरोबर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक तोटाही झाला आहे. या मार्गावरील २०० हून अधिक व्यापारी रस्त्यामुळे वैतागून गेले आहेत. यामध्ये हॉटेलधारक, मोबाईल, किराणा दुकान, चप्पल दुकान, फ्रुटस्, कृषी असे व्यापारी या रस्त्याच्या आजूबाजूला आहेत. अतिक्रमणधारकांची मर्जी राखण्यासाठी रस्ता मोठा करण्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. नगरपालिका ठेकेदाराला वारंवार मुदतवाढही देत आहे. या मार्गाचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. या मार्गावरून जाताना स्वामी भक्तांच्या नाकीनऊ येत आहे.
रस्ता बांधणीला सुरुवात झाल्यानंतर हे काम लवकर पूर्ण होईल आणि आमची समस्या सुटेल, अशी अपेक्षा होती; मात्र नेमके उलटे होत आहे. सुरुवातीला धुळीचा त्रास होत होता, तर आता रस्ता दीड वर्षापासून पूर्ण होत नसल्याने व्यवसायाची वाट लागली आहे.- स्वामीनाथ हेगडे, व्यापारी, अक्कलकोट
या अपूर्ण रस्त्यामुळे व्यापाºयांची आर्थिक कोंडी झाली आहे. अधिकारी व पदाधिकाºयांमध्ये समन्वय नसल्याचा गैरफायदा ठेकेदार घेत आहे. रस्त्यावरील धुळीने व्यापारी त्रस्त आहेत. वाहतुकीलाही त्रासही होत आहे.
-आप्पासाहेब पाटील, चालक, कृषी भांडार