लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता माल शिल्लक राहील, या भीतीपोटी हारांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली नाही. दरवर्षी छोट्या मोठ्या प्रमाणावर हार बनवणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगार मिळत नसल्याने यावर्षी हाराच्या भट्ट्या सुरूच केल्या नाहीत. त्यामुळे यंदा साखरेच्या हारांची बाजारपेठेत अपेक्षेप्रमाणे आवक कमीच राहिली.
सांगोला येथील किराणा व्यापारी साखरेचे हार होलसेल दराने पंढरपूर, अकलूज, नातेपुते आदी ठिकाणांहून खरेदी करतात. दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखरेचे हार छोटे-मोठे किराणा दुकानदार खरेदी करून त्याची विक्री करतात. दरम्यान, चार दिवसांपूर्वी बाजारपेठेत हार विक्रीचा दर ७० रुपये किलो होता. मात्र, सोमवारी अचानक काही दुकानातून १२०, तर काही ठिकाणी १५० रुपये किलोपर्यंत दरानेही हार विक्री झाल्याने साखरेच्या हाराने मोठाच भाव खाल्ल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
कोट :::::::::::::
दरवर्षी गुढीपाडव्याला दीड क्विंटल साखरेचे हार विक्री होतात. मात्र, यावर्षी कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हारांच्या विक्रीवर परिणाम होईल, या भीतीमुळे माल शिल्लक राहिला तर तोटा होण्यापेक्षा ७५० किलो हार खरेदी केले होते. मात्र, सोमवारी बाजारपेठेत अचानक हाराची मागणी वाढल्याने विक्रीसाठी हार शिल्लक राहिले नाहीत.
- मनोज ढोले
किराणा दुकानदार, सांगोला