सोलापूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी उजनी जलाशयातून समांतर पाइपलाइन टाकण्याच्या कामाला शासनदरबारी मंजुरी मिळाली असून, एकूण ११० किलोमीटरची पाइपलाइन असणार आहे. यामध्ये मोहोळ तालुक्यातून जाणाऱ्या या पाइपलाइनसाठी १४ गावांतील २८० गट अशी एकूण ६५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या संपादित जमिनीसाठी या परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन संमती घेण्यासंदर्भामध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मोहोळ येथे ही बैठक घेतली.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील, कार्यकारी अभियंता भांडेकर, गटविकास अधिकारी गणेश मोरे, नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे, कंपनीचे प्रकल्प अधिकारी श्रीनिवास राव उपस्थित होते.
----
स्क्वेअर मीटरप्रमाणे मिळणार मोबदला
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शेतकऱ्यांची मते जाणून घेतली. या पाइपलाइनसाठी चाळीस फूट जागा संपादित केली जाणार आहे. त्याचा मोबदला म्हणून स्क्वेअर मीटरप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे. टाकण्यात येणारी पाइपलाइन ही आधुनिक तंत्रज्ञान वापरून केली जाणार असल्यामुळे वारंवार मेंटेनन्ससाठी जमीन खोदण्याची गरज भासणार नाही. शासन स्तरावर संबंधित क्षेत्र हस्तांतरितही झालेले आहे. लवकरच त्याचे काम चालू होणार आहे, परंतु संबंधित शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे येऊन संमती दिली तर काम लवकर होण्यास मदत होईल. यासाठी शेतकऱ्यांनी हरकती न घेता संमती द्यावी, असे आवाहन केले.
------
यांनी दिली स्वत:हून संमती
यावेळी सावळेश्वरचे प्रा. माणिक गावडे, अर्जुनसोंड सावळेश्वरचे नामदेव पाटील, शेटफळचे दशरथ माळी, तेलंगवाडीचे पटोस बब्रुवान घोलप, चिंचोली काटीचे सुनील ठेंगील, अजित क्षीरसागर, चिखली परिसरातील रामभाऊ कदम यांनी स्वतःहून या कामाला आमची संमती असल्याचे सांगितल्याने या सर्वांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
-----
पाइपलाइनसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला त्याच्या क्षेत्रानुसार लाभार्थींच्या नावावर लवकरात लवकर जमा करण्यात येईल.
- त्र्यंबक ढेंगळे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी
-----